
पुणे, 07 सप्टेंबर (हिं.स.)।
शहरातील रक्तपेढ्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून रक्ताचा साठा निम्म्याने घटला असून, वाढत्या डेंग्यूच्या रुग्णांमुळे रक्ताची मागणी वाढली आहे. विशेषतः डेंग्यू रुग्णांना प्लेटलेट्सची आवश्यकता भासत असल्याने रक्तपेढ्यांवरील ताण वाढला आहे. त्याचबरोबर थॅलेसेमियाच्या रुग्णांना नियमित रक्तसंक्रमणाची गरज असल्याने रक्ताचा तुटवडा अधिक गंभीर होत आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.शहरातील सुमारे ७८० रुग्णालयांना दररोज सुमारे १,५०० रक्ताच्या पिशव्यांची आवश्यकता असते. मात्र, प्रत्यक्षात दररोज केवळ ७०० पिशव्यांचे रक्तसंकलन होत आहे. त्यामुळे मागणी आणि उपलब्धता यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे.गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये ऑक्टोबर महिन्यात रक्तदानाचे प्रमाण घटत असल्याचे दिसून येते. मात्र, यंदा सप्टेंबरमध्येच रक्ताचा तुटवडा जाणवू लागल्याने रक्तपेढ्यांची चिंता वाढली आहे. ऊन-पावसाचा लपंडाव आणि बदलत्या हवामानामुळे विविध साथीच्या आजारांचे प्रमाण वाढत असून, त्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.डेंग्यूच्या रुग्णांसाठी प्लेटलेट्सची गरज भासत असताना रक्तसाठा अपुरा पडत असल्याने उपचारांमध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रक्तपेढ्यांवरील वाढता ताण कमी करण्यासाठी नियमित रक्तदात्यांसह नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करणे आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु