

* ग्लोबल इम्पॅक्ट फोरमच्या दुसऱ्या आवृत्तीचा मुंबईत सांगता समारंभ
मुंबई, 07 सप्टेंबर (हिं.स.) - सांस्कृतिक वारसा, ज्ञान प्रणाली, आधुनिक तंत्रज्ञान, संवर्धन आणि नवउद्योजकता या घटकांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने आयोजित ‘ग्लोबल इम्पॅक्ट फोरम २ : सिव्हिलायझेशनल लेगसी’ या दोन दिवशीय जागतिक परिषदेचा मुंबईत उत्साहात समारोप झाला. या आंतरराष्ट्रीय सोहळ्यास जगभरातील प्रतिनिधी, सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गज, उद्योगपती आणि विचारवंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समारोप प्रसंगी महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत म्हणाले, महाराष्ट्र हे गेल्या चार वर्षांपासून उद्योग आणि थेट परकीय गुंतवणुकीत देशात अग्रस्थानी आहे. दावोसला जाऊन हजारो कोटींची गुंतवणूक आणणाऱ्या स्थानिक उद्योजकांचे आपण कौतुक केले पाहिजे. प्रगतीचे राजकारण न करता माध्यम, शासन आणि उद्योगांनी एकत्र येऊन एमएसएमई व स्टार्टअप्सना प्रोत्साहन दिले पाहिजे. महाराष्ट्रात गुंतवणूक आणि स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यावर शासनाचा भर आहे. प्रशासकीय विलंब टाळून ४८ तासांत सवलती मंजूर केल्या जात असून, छत्रपती संभाजीनगरपासून पुण्यापर्यंत प्रादेशिक विकासाला गती दिली जात आहे.
एपी ग्लोबलेच्या संचालक जान्हवी पवार यांनी कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले, संस्कृती ही जागतिक स्तरावर व्यापार करण्याची खरी पायाभरणी आहे. विविध तत्त्वज्ञानांचा आदर करून आणि मानवी मूल्ये जोपासूनच आपण शाश्वत विश्वास आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य प्रस्थापित करू शकतो. भारताचे नवनवीन शोध आज दीपटेक, संस्कृती आणि उद्योजकतेच्या क्षेत्रात जागतिक पटलावर नवी व्याख्या लिहीत आहेत.
परिषदेच्या दुसऱ्या दिवशी रशिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांसोबतच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक संबंधांवर विशेष चर्चासत्रे पार पडली. भारत-रशिया सत्रात अभिनेत्री उमा दासगुप्ता आणि रशियन उपकांसुल मातवेई फेतिसोव्ह यांनी टागोर आणि टॉलस्टॉय यांच्यातील साहित्यिक मैत्रीवर प्रकाश टाकला. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि चित्रपटनिर्मिती विषयावर फिनामेनल एआयचे सीईओ संजय रॉड्रिग्ज आणि रशियन हाऊसचे प्रमुख व्हिक्टर गोरेलिच यांनी विचार मांडले. याशिवाय, प्रसिद्ध सितारवादक उस्ताद पुरबायन चॅटर्जी यांनी अभिजात संगीताच्या जागतिक प्रसारावर मार्गदर्शन केले.
भारत-दक्षिण आफ्रिका सत्रात वन्यजीव संवर्धन, भाषा जतन आणि वैचारिक स्वातंत्र्यावर सखोल मंथन झाले. परिषदेत 'लेगसी अवर' आणि 'फाउंडर्स ट्रॅक'च्या माध्यमातून स्टार्टअप्सना गुंतवणूकदार व मार्गदर्शकांशी जोडणारे प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले.
या परिषदेने ब्रिक्स (BRICS) शिखर परिषद २०२६ च्या पार्श्वभूमीवर जागतिक सहकार्यासाठी एक मजबूत वैचारिक पाया तयार केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी