
अमरावती, 08 सप्टेंबर (हिं.स.) | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठा विविध प्रकारच्या सजावटीच्या साहित्याने सजल्या आहेत. रंगीबेरंगी फुले, झालरी, तोरणे आणि आकर्षक सजावटीच्या वस्तूंनी बाजारपेठा फुलल्या असल्या तरी नैसर्गिकरीत्या विघटन न होणाऱ्या प्लास्टिकच्या कृत्रिम फुलांसह प्रतिबंधित सजावटीच्या साहित्याची विक्रीही मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे चित्र आहे. पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या अशा साहित्यावर राज्यात निर्बंध असतानाही काही ठिकाणी त्याची खुलेआम विक्री होत आहे. त्यामुळे आता संबंधित विक्रेते, वापरकर्ते आणि डेकोरेटर्सवर कारवाईचा इशारा देण्यात आला असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना २५ हजार रुपयांपर्यंत दंड आणि तीन महिन्यांपर्यंत कारावासाची तरतूद आहे.गणेशोत्सवासाठी शहरातील बाजारपेठांमध्ये विविध प्रकारच्या सजावटीचे साहित्य दाखल झाले आहे. कमी किमतीत उपलब्ध होणाऱ्या आणि आकर्षक दिसणाऱ्या प्लास्टिकच्या कृत्रिम फुलांना ग्राहकांची पसंती मिळत असल्याने दुकानदारांनी मोठ्या प्रमाणात या वस्तू विक्रीसाठी आणल्या आहेत. गणेश मंडळांसह घरगुती गणपतीच्या सजावटीसाठीही या साहित्याची खरेदी होत आहे.
नैसर्गिक फुलशेतीलाही फटकाप्लास्टिकच्या कृत्रिम फुलांचा वाढता वापर केवळ पर्यावरणासाठीच घातक नाही, तर त्याचा परिणाम स्थानिक फूल उत्पादक शेतकऱ्यांवरही होऊ शकतो. कृत्रिम फुलांमुळे नैसर्गिक फुलांची मागणी कमी झाल्यास फूलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. त्यामुळे गणेशभक्तांनी स्थानिक शेतकऱ्यांकडून उत्पादित नैसर्गिक फुलांचा वापर केल्यास पर्यावरणपूरक गणेशोत्सवासोबत शेतकऱ्यांनाही आर्थिक हातभार लागू शकतो.
प्लास्टिक, थर्माकोलच्या साहित्यावर निर्बंधनैसर्गिकरीत्या विघटन न होणाऱ्या प्लास्टिकच्या कृत्रिम फुलांसह विविध प्रतिबंधित प्लास्टिक वस्तू, प्लास्टिक झालरी, थर्माकोल आणि पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या साहित्याच्या वापरावर निर्बंध आहेत. मात्र, काही बाजारपेठांमध्ये नियम धाब्यावर बसवून या वस्तूंची विक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे. संबंधित यंत्रणांनी बाजारपेठांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.
विसर्जनानंतर वाढतो प्लास्टिक कचरागणेशोत्सव संपल्यानंतर प्लास्टिकची फुले, झालरी आणि थर्माकोल मोठ्या प्रमाणात कचऱ्यात जमा होतात. हे साहित्य सहज विघटित होत नसल्याने दीर्घकाळ पर्यावरणात राहते. नाले, जलस्रोत आणि मातीमध्ये प्लास्टिक कचरा साचल्याने प्रदूषणाची समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. प्लास्टिकचे साहित्य जाळल्यास त्यातून घातक धूर व रसायने बाहेर पडून मानवी आरोग्य आणि पर्यावरणावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
डेकोरेटर्सवरही कारवाईची शक्यताकेवळ प्रतिबंधित साहित्य विकणाऱ्यांवरच नव्हे, तर गणेशोत्सवातील सजावटीसाठी प्लास्टिकची कृत्रिम फुले, झालरी किंवा थर्माकोलचा वापर करणाऱ्या डेकोरेटर्सवरही नियमानुसार कारवाई होऊ शकते. त्यामुळे गणेश मंडळे, नागरिक आणि डेकोरेटर्सनी सजावटीसाठी कापड, कागद, लाकूड, फुले, पाने आणि इतर पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.गणेशोत्सव हा श्रद्धेचा आणि उत्साहाचा सण असला तरी त्यासोबत पर्यावरण संवर्धनाची जबाबदारीही प्रत्येकाची आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रतिबंधित प्लास्टिक साहित्य खरेदी न करता नैसर्गिक व पर्यावरणपूरक सजावटीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी