
अमरावती, 08 सप्टेंबर (हिं.स.)। विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आईचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी राज्यातील शाळांमध्ये वर्षातून चार वेळा माता-पालक शैक्षणिक मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून मातांना मुलांचा अभ्यास कसा घ्यावा, त्यांना वाचन-लेखनाची सवय कशी लावावी आणि घरातील अभ्यासाचे वातावरण कसे पोषक ठेवावे, याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
प्रत्येक मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला जाणार असून, त्यांच्या वाचन, लेखन आणि अभ्यासाच्या सवयींची माहिती पालकांना देण्यात येईल. तसेच मुलांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन घरच्या घरी करता येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती मातांना दिली जाणार आहे. या मेळाव्यात केवळ शैक्षणिक बाबींवरच नव्हे, तर बालसुरक्षा, आरोग्य आणि शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांबाबतही पालकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मुख्याध्यापक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीवर या मेळाव्याच्या आयोजनाची प्राथमिक जबाबदारी सोपविण्यात येणार आहे.
राज्यातील विविध माध्यमांच्या तसेच सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच इतर व्यवस्थापनांच्या शाळांचा समावेश राहणार आहे. विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार प्रत्येक मेळाव्यातील मार्गदर्शनाचे स्वरूप निश्चित केले जाणार आहे. मुलांच्या शिक्षणातील आईची भूमिका केवळ गृहपाठ तपासण्यापुरती मर्यादित न राहता ती अधिक प्रभावी आणि सक्रिय करण्याचा या उपक्रमामागील उद्देश आहे. नियमित वाचन, लेखन आणि अभ्यासाच्या सवयी विकसित करण्यासाठी पालकांनी मुलांसोबत कसा संवाद साधावा, याचेही मार्गदर्शन केले जाणार आहे.
दरम्यान, या उपक्रमाचे शिक्षक संघटनांकडून स्वागत करण्यात आले असले तरी वर्षातून चार वेळा मेळावे घेण्याची अतिरिक्त जबाबदारी शिक्षकांवर टाकताना त्यांच्या नियमित शैक्षणिक कामाचा विचार करण्याची मागणी करण्यात आली आहे. शिक्षकांना अनावश्यक प्रशासकीय कामांपासून मुक्त करून मेळाव्यासाठी आवश्यक वेळ व मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष प्रकाश चुनारकर यांनी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी