
अमरावती, 08 सप्टेंबर (हिं.स.)। चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथे ग्रामस्थांनी स्वखर्चातून व श्रमदानातून तयार केलेल्या पांदण रस्त्याच्या कामावर शासकीय निधी काढण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. संबंधित ठेकेदार, रोजगार सेवक व अधिकाऱ्यांच्या संगनमताने काम न करताच मस्टर व बिलांच्या माध्यमातून निधी काढण्यात आल्याचा आरोप ग्रामीणांनी केला असून, या प्रकरणात लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सूत्रांनुसार, मिलिंद पेठे ते दीपक दाभाडे यांच्या शेतापर्यंत पाणंद रस्त्याच्या कामासाठी अलीकडेच निधी काढण्यात आला. मात्र, संबंधित रस्त्यावर कोणतेही प्रत्यक्ष काम झाले नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. उलट, या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी दोन महिन्यांपूर्वी स्वतः पैसे जमा करून आणि श्रमदानातून मुरूम टाकल्याचे सांगितले आहे. प्रत्यक्ष काम न करता शासकीय निधी काढण्यात आल्यास संबंधितांची चौकशी व कारवाईची मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, चांदूर बाजारचे तहसीलदार व आ. प्रवीण तायडे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
पाणंद रस्ता योजनेतील कामांवरही प्रश्नचिन्ह
मातोश्री पाणंद रस्ता योजनेअंतर्गत परिसरात सुरू असलेल्या विविध कामांमध्ये अनियमितता होत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. प्रत्यक्ष बांधकाम न करता किंवा अपूर्ण काम पूर्ण झाल्याचे दाखवून बिलांची उचल केली जात असल्याचा दावा करण्यात येत आहे. यापूर्वीही एसटी स्टैंड, सोमवारखेडा ते पानझरी तलाव पाणंद रस्ता या कामाबाबत काम न करता मस्टर काढल्याची तक्रार तहसीलदारांकडे केली होती. तक्रारीनंतरही यंत्रणेकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
दोन महिन्यांपूर्वी आम्ही सर्वांनी पैसे जमा करून स्वखर्चातून या रस्त्यावर मुरूम टाकला. अलीकडेच या रस्त्याच्या कामासाठी शासनाकडून निधी काढण्यात आल्याचे समजले. हा प्रकार गंभीर असून, याबाबत आम्ही वरिष्ठ कार्यालयात लेखी तक्रार केली आहे.
- अमित लेवटे, तक्रारदार नागरिक.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी