
अमरावती, 08 सप्टेंबर (हिं.स.)। परिसरातील कृषी फीडरवरील विजेच्या अनियमित पुरवठ्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. महावितरणच्या नियंत्रण कक्षाकडून ‘सर्व कृषी फीडरवरील तीन फेज वीजपुरवठ्यासाठी इमर्जन्सी लोडशेडिंगचा संदेश दिला जात असून, पुढील आदेशापर्यंत वीजपुरवठा सुरू होणार नसल्याचे कळविले जाते. मात्र, संदेशात नमूद केलेली वेळ आणि प्रत्यक्ष वीजपुरवठ्याची वेळ, यामध्ये मोठी तफावत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
मोबाईलवर वीजपुरवठ्याची वेळ कळविली जाते, परंतु प्रत्यक्षात त्यानुसार वीज मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. वीजपुरवठ्याबाबत पॉवर स्टेशनशी संपर्क साधल्यास ‘वरून संदेश आला आहे’, असे सांगण्यात येते. तर संबंधित कनिष्ठ अभियंत्यांशी संपर्क साधला असता समाधानकारक माहिती मिळत नसून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सध्या कृषीपंपांसाठी दिवसा सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत वीजपुरवठा केला जातो. मात्र, या कालावधीत वीजवाहिनीवर फॉल्ट झाल्यास संबंधित कर्मचारी वेळेत घटनास्थळी पोहोचत नसल्याने वीजपुरवठा सुरळीत होण्यास मोठा विलंब होत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.
कर्मचारी साधारणतः सकाळी ११ वाजेपर्यंत घटनास्थळी पोहोचत असल्याने सिंचनासाठी उपलब्ध असलेला शेतकऱ्यांचा महत्त्वाचा वेळ वाया जातो. त्यामुळे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश द्यावेत आणि सकाळी सात ते दुपारी तीन या कालावधीत नियमित वीजपुरवठा मिळेल, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, सिंगल फेज वीजपुरवठ्यातही मोठी अनियमितता असल्याची तक्रार आहे. हा वीजपुरवठा शासन व महावितरणच्या नियमानुसार नियमित करण्यात यावा. शेतकऱ्यांना वीजपुरवठ्याबाबत स्पष्ट वेळापत्रक व अचूक माहिती मिळावी, तसेच तक्रारींचे तातडीने निराकरण व्हावे, यासाठी संबंधित कनिष्ठ अभियंत्यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी द्यावेत, अशी मागणी परिसरातील शिवसेना नेते मनदेव चव्हाण यांनी केली आहे.
पावसाने दडी मारल्याने पिकांना सिंचनाची अत्यंत गरज असताना वीजपुरवठ्याचा हा लपंडाव शेतकऱ्यांच्या अडचणीत भर घालत आहे. पिकांना वेळेवर पाणी देणे आवश्यक असताना वीजपुरवठा अनियमित होत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून सिंगल फेज तसेच थ्री फेज कृषी वाहिनीवरील वीजपुरवठा नियमानुसार व नियमित करावा, फॉल्ट दुरुस्तीसाठी कर्मचारी तत्काळ उपलब्ध ठेवावेत आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी मनदेव चव्हाण यांनी केली आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी