अमरावती : रेशनच्या धान्याच्या गुणवत्तेवर एफडीएची नजर; दुकानांची होणार प्रत्यक्ष तपासणी
अमरावती, 08 सप्टेंबर (हिं.स.)। रेशन दुकानातून लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या धान्याच्या गुणवत्तेबाबत सातत्याने तक्रारी होत असताना आता अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) रेशन दुकानांकडे लक्ष केंद्रित केले आहे. येत्या काही दिवसांत रेशन दुकाना
धान्यात कधी खडे, तर कधी किडे; आता ‘एफडीए’च्या रडारवर रेशन दुकाने!


अमरावती, 08 सप्टेंबर (हिं.स.)। रेशन दुकानातून लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या धान्याच्या गुणवत्तेबाबत सातत्याने तक्रारी होत असताना आता अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) रेशन दुकानांकडे लक्ष केंद्रित केले आहे. येत्या काही दिवसांत रेशन दुकानांची प्रत्यक्ष तपासणी करण्यात येणार असून, धान्याची गुणवत्ता, साठवणूक व्यवस्था, स्वच्छता तसेच अन्न सुरक्षा नियमांचे पालन याची पडताळणी केली जाणार आहे. रेशनच्या तांदूळ आणि गव्हामध्ये कधी खडे, कधी किडे, कचरा, तर काही ठिकाणी उंदरांच्या लेंड्या आढळत असल्याच्या तक्रारी लाभार्थ्यांकडून केल्या जातात. काही वेळा धान्य खराब किंवा दुर्गंधीयुक्त असल्याचेही सांगितले जाते. त्यामुळे अशा धान्याच्या सेवनामुळे लाभार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोंदट, दमट जागेत धान्याची साठवणूकरेशन दुकानांमध्ये धान्याची योग्य पद्धतीने साठवणूक होणे आवश्यक आहे. मात्र, काही ठिकाणी कोंदट, दमट आणि अस्वच्छ जागेत धान्य ठेवले जात असल्याच्या तक्रारी आहेत. अशा वातावरणामुळे धान्याला बुरशी लागणे, किडे होणे किंवा त्याचा दर्जा खालावण्याची शक्यता असते. त्यामुळे तपासणीदरम्यान दुकानातील साठवणूक व्यवस्था, जागा कोरडी व हवेशीर आहे का, धान्य जमिनीपासून योग्य अंतरावर ठेवले आहे का, याचीही पाहणी होणार आहे.

एफएसएसएआय परवान्याचीही पडताळणी?रेशन दुकानांमधून खाद्यपदार्थाचे वितरण होत असल्याने अन्न सुरक्षा नियमांचे पालन आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित दुकानांना एफएसएसएआय परवाना किंवा नोंदणी कोणत्या श्रेणीत लागू आहे, याचीही पडताळणी केली जाण्याची शक्यता आहे. दुकानांमध्ये अन्न सुरक्षा मानकांनुसार आवश्यक प्रक्रिया आणि व्यवस्था आहेत का, याची माहितीही प्रशासनाकडून घेतली जाणार आहे.

धान्याच्या गुणवत्तेसह स्वच्छतेवर भरतपासणीदरम्यान तांदूळ, गहू आदी धान्याचा दर्जा तपासला जाणार आहे. धान्याची साठवणूक कशी केली जाते, दुकानातील परिसर स्वच्छ आहे का, कीटक व उंदरांचा प्रादुर्भाव आहे का, याचीही पाहणी केली जाईल. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन अथवा गंभीर त्रुटी आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई होण्याची शक्यता आहे.

लाभार्थ्यांच्या तक्रारींची प्रत्यक्ष पडताळणीधान्यात खडे, किडे, कचरा तसेच उंदरांच्या लेंड्या आढळल्याच्या तक्रारी अधूनमधून समोर येतात. त्यामुळे एफडीएकडून होणारी तपासणी महत्त्वाची ठरणार आहे. या कारवाईमुळे रेशनच्या धान्याबाबतच्या तक्रारींची वस्तुस्थिती समोर येण्यास मदत होऊन लाभार्थ्यांना सुरक्षित आणि दर्जेदार धान्य मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, शासनाकडून ज्या स्थितीत धान्य प्राप्त होते, त्याच धान्याचे लाभार्थ्यांना वितरण केले जाते. दुकानातील स्वच्छता आणि धान्याची योग्य साठवणूक करण्याची काळजी घेतली जाते, असे रेशन दुकानदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे एफडीएच्या तपासणीत धान्याच्या गुणवत्तेबरोबरच पुरवठ्याच्या टप्प्यावरही गुणवत्ता नियंत्रण कितपत होते, हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande