डोंबिवली : नेहमी होते बत्ती गुल, फक्त आश्वासनांवर समाधान मानायचे का ?
डोंबिवली, १७ सप्टेंबर, (हिं.स.) : पूर्वेकडील एमआयडीसी निवासी भागात बत्ती गुल होण्याची समस्या त्रासदा
डोंबिवली : नेहमी होते बत्ती गुल, फक्त आश्वासनांवर समाधान मानायचे का ?


डोंबिवली, १७ सप्टेंबर, (हिं.स.) : पूर्वेकडील एमआयडीसी निवासी भागात बत्ती गुल होण्याची समस्या त्रासदायक ठरत आहे. वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे चार-पाच तास वीजप्रवाह खंडित होत आहे. ऐन गणपती उसत्व सणासुदीच्या काळातही काळोख होत आहे. येथील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यामुळे समस्या गंभीर होत आहेत. 100 टक्के बिले भरूनही बत्ती गुल होत असेल तर आता फक्त आश्वासनावरच समाधान मानायचे का असा खोचक प्रश्न डोंबिवलीकर वीजग्राहक विचारात आहेत.

महावितरणाचा निषेध ! निषेध !! असा मजकूर प्रसार माध्यमातून गणेशोत्सवदरम्यान प्रसारीत होत आहे. डोंबिवली एमआयडीसी निवासी भागात वीज पुरवठा खंडित झाल्याने येथील रहिवाशांनी महावितरणाच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया समाज माध्यमांवर येत आहेत. श्रीगणेश जयंतीच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी अधून-मधून वीज जात-येत होती. गणेशोत्सवात जर वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वारंवार होत असतील तर हेच प्रकार मोहरम, ईद, या सणाच्या दिवसांत, त्या भागात वीज पुरवठा बंद करण्याची हिम्मत महावितरणाची होईल का ? आमच्या भागात वीज बिल वेळेत भरण्याचे प्रमाण 100 टक्के आहे, म्हणून हेच का बक्षीस ? अशा तऱ्हेच्या अनेक तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

काल संपूर्ण निवासी परिसरात सकाळी साडेसात वाजता गेलेली वीज दुपारी एक वाजता आली. सलग सहा साडेसहा तास वीज पुरवठा बंद राहिल्याने त्याचा परिणाम पाणी, ऑनलाईन शिक्षण, नोकरी इत्यादीवर झाला होता. वीज पुरवठा बंद होण्याची कारणे महावितरणकडून ठराविक साचात मिळत असल्याने नागरिक त्रासले आहेत. विशेष म्हणजे येथील महावितरणच्या अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने, त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांच्याकडूनही नीट माहिती किंवा मेसेज मिळत नाहीत.

कल्याण येथील तेजश्री बिल्डिंग मुख्य कार्यालयातील अधिक्षक अभियंता काकडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचीही बदली झाल्याने डोंबिवलीकर वीजग्राहक आपल्या पक्षांच्या राजकीय पुढाऱ्यांशी संपर्क साधत आहेत. येथील वीज ग्राहकांनी यापूर्वी महावितरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी याच विषयावर भेटी घेतल्या होत्या. त्यावेळी त्यांनी भविष्यात वीज पुरवठा सुरळीत सुरु राहण्यासाठी कसे नियोजन आणि इतर तयारी करणार आहोत अशी मोठी आश्वासनांची यादी देऊन खुश करण्यात आले होते. परंतु आता त्यातील बहुतेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यामुळे परत नवीन अधिकाऱ्यांकडे जाऊन तीच आश्वासने मिळवावी लागतील, त्यात आम्ही समाधान मानायचे का, असे प्रश्न नागरिक विचारात आहेत.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande