पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ यांचे निधन
* कारगिल युद्धात केली होती आगळीक दुबई, ५ फेब्रुवारी (हिं.स.) : पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख तथा कार
परवेज मुशर्रफ 


* कारगिल युद्धात केली होती आगळीक

दुबई, ५ फेब्रुवारी (हिं.स.) : पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख तथा कारगिल युद्धाची आगळीक करणारे परवेज मुशर्रफ यांचे निधन झाले आहे. ते ७९ वर्षांचे होते. प्रदीर्घ काळ आजारपणामुळे त्रस्त असल्याने त्यांच्यावर दुबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान आज त्यांची प्रकृती जास्त खालावली आणि त्यातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. २०१६ पासून त्यांच्यावर दुबईमध्ये उपचार सुरू होते.

परवेज मुशर्रफ यांचा जन्म ११ ऑगस्ट १९४३ साली दिल्ली येथे झाला होता. १९४७ साली फाळणी दरम्यान त्यांचे कुटुंब दिल्लीहून कराची येथे स्थायिक झाले होते. १९७४ साली मुशर्रफ पाकिस्तानी सैन्यात रुजू झाले होते. १९९९ ते २००८ या कालावधीत त्यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख म्हणून कारभार सांभाळला. त्यांनी २००१ ते २००८ या काळात त्यांनी राष्ट्रपती म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणूनही त्यांनी काम पाहिले. २०१६ पासून ते दुबई येथे स्थायिक झाले होते. त्यांच्यावर प्राणघातक हल्ले झाल्यामुळे त्यांना पाकिस्तान सोडावे लागले होते.

देशद्रोहाचा गुन्हा दाखल

मुशर्रफ यांच्यावर डिसेंबर २०१३ मध्ये ३ नोव्हेंबर २००७ रोजी देशात आणीबाणी लागू केल्याबद्दल आणि डिसेंबर २००७ च्या मध्यापर्यंत राज्यघटना निलंबित केल्याचा आरोप होता. या प्रकरणी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ३१ मार्च २०१४ रोजी मुशर्रफ यांना दोषी ठरवण्यात आले होते.

कारगिल युद्धात आगळीकी, भारतीय सैनिकांचे असीम शौर्य

पाकिस्तानचे लष्करप्रमुख असताना परवेज मुशर्रफ यांनी कारगिल युद्धाची आगळीक केली होती. भारतीय सैनिकांनी कारगिल युद्धात असीम शौर्य दाखवले होते. तर याच युद्धाला मुशर्रफ यांचे कट कारस्थान म्हणून ओळखले जाते. आपल्या राजकीय इच्छा पूर्ण करण्यासाठी मुशर्रफ यांनी कारगिलचे युद्ध छेडले होते. आपले आत्मचरित्र “इन द लाइन ऑफ फायर” यामध्ये त्यांनी या युद्धाबाबत लिहिले की, पाकिस्तानी सैन्य युद्धात सहभागी होते, मात्र हे सत्य आम्ही लपवले. या युद्धातील पराभवाचे खापर मुशर्रफ यांनी तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर फोडले होते.

नवाज शरीफ यांना काढले होते सत्तेबाहेर

तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ हे श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेले असताना त्यांनी मुशर्रफ यांना लष्कर प्रमुख पदावरून हटविले होते. त्यांच्याजागी जनरल अजीज यांना लष्कर प्रमुख बनविण्यात आले. मात्र जनरल अजीज हे परवेज मुशर्रफ यांचे विश्वासू सहकारी आहेत, याची नवाज शरीफ यांना कल्पना नव्हती. अखेर परवेज मुशर्रफ यांनी लष्कराच्या बळावर सत्ता काबिज करून नवाज शरीफ यांना सत्तेबाहेर काढले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande