भारत आणि मालदीव दरम्यान चौथा संरक्षण सहकार्य संवाद संपन्न
नवी दिल्ली, 19 मार्च (हिं.स.) : भारत आणि मालदीव दरम्यान चौथा संरक्षण सहकार्य संवाद माले येथे आज (19
Defense Cooperation Dialogue


नवी दिल्ली, 19 मार्च (हिं.स.) : भारत आणि मालदीव दरम्यान चौथा संरक्षण सहकार्य संवाद माले येथे आज (19 मार्च) संपन्न झाला. संरक्षण सचिव गिरीधर अरमाने आणि मालदीवचे संरक्षण दल प्रमुख, मालदीव राष्ट्रीय संरक्षण दल, मेजर जनरल अब्दुल्ला शमाल यांनी बैठकीचे सहअध्यक्षपद भूषवले.

संरक्षण सहकार्य संवाद ही दोन देशांमधील संवादाची सर्वोच्च संस्थागत व्यवस्था आहे. या संवादाला दोन्ही देशांनी दिलेले महत्व हेच अधोरेखित करते की दोन्ही देशांच्या संरक्षण दलांतल्या भविष्यातील संबंधांची रूपरेषा ठरविण्यात हा संवाद अतिशय महत्वाचा आहे. या बैठकीत दोन्ही देशांच्या संरक्षण विषयक सहकार्याबाबत सुरु असलेल्या द्विपक्षीय उपक्रमांचा आढावा घेण्यात आला आणि दोन्ही देशांनी या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले. सध्या सुरु असलेल्या द्विपक्षीय युद्ध सरावावर चर्चा करण्यात आली, हे युद्धसराव अधिक संमिश्र आणि गुंतागुंतीचे करण्यावर या बैठकीत दोन्ही देशांची सहमती झाली.

भारतीय संरक्षण दल आणि मालदीव विविध क्षेत्रांत द्विपक्षीय सहकार्य सुरु ठेवतील आणि द्विपक्षीय संबंधांच्या भविष्याचे द्योतक म्हणून सहकार्य वाढविण्यावर भर देतील. गिरीधर अरमाने यांनी मेजर जनरल अब्दुल्ला शमाल आणि त्यांच्या प्रतिनिधी मंडळाचे या यशस्वी संवादासाठी आभार मानले आणि चौथ्या संरक्षण सहकार्य संवादात मान्य झालेल्या सामायिक मुद्द्यांवर सहकार्य पुढे नेण्यास भारत तयार असल्याचे सांगितले.

या मालदीव भेटीत संरक्षण सचिवांनी मालदीवच्या संरक्षण मंत्री मारिया अहमद दीदी आणि परराष्ट्र व्यवहार राज्य मंत्री अब्दुल्ला शाहीद यांची देखील भेट घेतली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande