शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासन प्रयत्नशील - अब्दुल सत्तार
नाशिक, २१ मार्च (हिं.स.) : नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे नुकसान झालेल्या भागाचा आज कृषी
मंत्री अब्दुल सत्तार


नाशिक, २१ मार्च (हिं.स.) : नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे नुकसान झालेल्या भागाचा आज कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दौरा केला. त्यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आवश्यक त्या सर्व मदतीसाठी शासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत, असे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील कुंभारी, पंचकेश्वर व रानवड येथील अवकाळी पाऊस व गारपीटीने नुकसान झालेल्या भागाची कृषी मंत्री सत्तार यांनी पाहणी करून तेथील शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यांच्या समस्या व भावना जाणून घेतल्या. यावेळी शेतकऱ्यांच्या शेतातील द्राक्ष व पिकांच्या झालेल्या नुकसानीची कृषीमंत्री यांनी प्रत्यक्ष शेतात जावून पाहणी केली. झालेल्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करून घेण्याच्या सूचनाही कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी उपस्थित कृषि अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधतांना कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा पाहणी दौरा करून झालेल्या नुकसानीच्या मदतीसाठी शासनाकडे अहवाल सादर करण्यात येणार आहे. याबाबत मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चेद्वारे सकारात्मक निर्णय त्वरीत घेण्यात येणार आहे, अशी माहिती कृषीमंत्री सत्तार यांनी यावेळी दिली.या पाहणी दौऱ्यात कृषी सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, निफाड प्रांताधिकारी अर्चना पठारे, तहसिलदार शरद घोरपडे, तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande