महिला आर्थिक सक्षमीकरणाला पाठबळ द्यावे -उपजिल्हाधिकारी
अकोला, 21 मार्च (हिं.स.) : महिला व बाल विकास विभाग व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्यावतीने जिल्हास
महिला आर्थिक सक्षमीकरणाला पाठबळ द्यावे -उपजिल्हाधिकारी


अकोला, 21 मार्च (हिं.स.) : महिला व बाल विकास विभाग व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्यावतीने जिल्हास्तरावर महिला बचत गटाव्दारे उत्पादीत वस्तूंचे प्रदर्शन व विक्री महोत्सव ‘तेजस्विनी’ चे आयोजन 24 ते 26 मार्च दरम्यान स्वराज भवन मैदानावर करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचा अकोलेकर नागरिक, महिला तसेच सर्व वयोगटाच्या व्यक्तिंनी घ्यावा व महिला आर्थिक सक्षमीकरणाच्या चळवळीला पाठबळ द्यावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी केले आहे.

तेजस्विनी या प्रदर्शनाच्या आयोजनाबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वय अधिकारी श्रीमती वर्षा खोब्रागडे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकतअली मिरसाहेब व पत्रकार बांधव आदी उपस्थित होते. श्रीमती वर्षा खोब्रागडे यांनी पत्रकारांना माहिती दिली की, प्रदर्शनात जिल्ह्यातील सात तालुक्यातील 80 बचतगट सहभाग घेणार आहेत. महिला व बालविकास विभाग तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरावर शुक्रवार 24 ते रविवार 26 दरम्यान महिला बचत गटांनी उत्पादीत केलेल्या विविध उत्पादनांचे प्रदर्शन ‘तेजस्विनी’ चे आयोजन करण्यात आले आहे. अकोला शहरातील स्वराज भवन मैदानावर हे तीन दिवसीय प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील महिला बचत गटांनी तयार केलेली उत्पादने या प्रदर्शनात पाहणी व विक्रीसाठी उपलब्ध असतील. जिल्ह्यातील सात तालुक्यातील 80 बचतगट यात सहभाग घेणार असून 50 स्टॉलव्दारे तीन दिवसांत या उत्पादनांच्या विक्रीतून 12 लाख रुपयांपर्यंतची उलाढाल अपेक्षित आहे. याशिवाय महिलांना उत्पादन, मार्केटिंग, व्यवसायाचे ज्ञान मिळावे यासाठी विविध विषयांतील तज्ज्ञांची व्याख्यानेही आयोजित करण्यात आले आहेत. तसेच मनोरंजनाचे कार्यक्रमही होणार आहेत. अकोला शहर तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी,असे आवाहन महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वय अधिकारी श्रीमती वर्षा खोब्रागडे यांनी केले आहे.

शेलार म्हणाले की, दि.24 ते दि.26 तीन दिवसांत बचत गटाव्दारे उत्पादित वस्तूंची अधिकाधिक विक्री व्हावी व बचतगट चळवळीला चालना मिळून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला वाव मिळावा, यासाठी हे प्रदर्शन आहे. त्यात वस्तू, पदार्थांची विक्री होणार आहे. हे सर्व पदार्थ कृत्रिम रसायने विरहित घरगुती खाद्यपदार्थ, गृहपयोगी वस्तू, आदिवासींव्दारे उत्पादित आहेत. बहुतांश वस्तू व पदार्थ ह्या घरगुती वापराच्या आहेत. दैनंदिन जीवनात उपयुक्त आहेत. यात कारागिर महिला, सुगरण महिलांच्या कौशल्य व कलाकुसरीचा प्रत्यय येतो. तसेच या तीन दिवसीय कार्यक्रमात तज्ज्ञांची व्याख्याने व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या मेजवानी हा लाभ नागरिकांना होणार आहे. तीन दिवशीय प्रदर्शनात नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी केले आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande