रत्नागिरीतील गडनदीच्या नव्या पुलावरून लवकरच वाहतूक सुरू
रत्नागिरी, 26 एप्रिल, (हिं. स.) : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणातील आरवली येथे गडनदीवरील नव्या
रत्नागिरीतील गडनदीच्या नव्या पुलावरून लवकरच वाहतूक सुरू


रत्नागिरी, 26 एप्रिल, (हिं. स.) : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणातील आरवली येथे गडनदीवरील नव्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुलावरील रस्त्यावर काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर नव्या पुलावरून वाहतूक सुरू होणार आहे.

याबाबत राष्ट्रीय महामार्ग चिपळूण विभागाचे उपअभियंता राजेंद्र कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरवली येथे गडनदीवर पूल उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुलाच्या दोन्ही बाजूने जोडरस्त्याचे मातीकामही पूर्ण झाले आहे. आता काँक्रीटचे काम सुरू आहे. अधूनमधून वाहतुकीची चाचणी घेतली जात आहे. काँक्रीटचे काम शंभर टक्के पूर्ण झाल्यानंतर नव्या पुलावरून वाहतूक सुरू होईल.

मुंबई-गोवा महामार्गावर एकूण २९ ठिकाणी लहान-मोठे पूल उभारले जात आहेत. यातील बहुसंख्य पुलाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, गडनदीवरील पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले नव्हते. नदीतून पुलाचे पिलर बाहेर करण्यात आले होते. पूल नव्या ठिकाणी उभारला जात असल्यामुळे त्याचा वाहतुकीला कोणताही त्रास झाला नाही. जुन्या पुलावरून नियमित वाहतूक सुरू आहे. आरवली परिसरात मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अत्यंत वेगाने सुरू आहे. उड्डाणपुलाच्या सर्व्हिस रोडने दोन्ही बाजूची वाहतूक सुरू आहे. गडनदीवरील पुलाची उभारणी मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. पुलासाठी जोडरस्ता तयार करताना येथील गरम पाण्याचे कुंड बुजवले जातील, अशी चर्चा होती. स्थानिक ग्रामस्थांच्या हस्तक्षेपानंतर महामार्ग विभागाने गरम पाण्याच्या कुंडापासून काही अंतरावरून रस्ता तयार केला आहे. गरम पाण्याच्या कुंडाला संरक्षित करण्यासाठी एका बाजूने संरक्षण भिंतही उभारण्यात आली आहे. पुलाच्या जोडरस्त्यासाठी मागील पंधरा दिवस येथे मातीचा भराव टाकण्याचे काम सुरू होते. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

गडनदीवरील पूल आणि उड्डाणपूल एका रस्त्याने जोडण्यात आले आहे. यासाठी मातीचा भराव करताना एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे आरवली परिसरात मंगळवारी वाहतूककोंडी झाली होती. आता रस्त्याचे काँक्रीटचे काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर लवकरच नव्या पुलावरून वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande