छत्रपती संभाजीनगर: ईडीकडून उपायुक्तांची कसून चौकशी
घरकूल निविदा घोटाळा प्रकरण छत्रपती संभाजीनगर, 21 मार्च (हिं.स.) :छत्रपती संभाजीनगरमधील बहुचर्चित पंत
संग्रहित


घरकूल निविदा घोटाळा प्रकरण

छत्रपती संभाजीनगर, 21 मार्च (हिं.स.) :छत्रपती संभाजीनगरमधील बहुचर्चित पंतप्रधान आवास योजनेच्या निविदा घोटाळ्याची सक्तवसुली संचनालया मार्फत (ईडी) चौकशी केली जात आहे. ईडीने महापालिकेच्या उपायुक्त अपर्णा थेटे यांना सोमवारी 20 मार्च रोजी मुंबई कार्यालयात बोलावले होते. सोमवारी दिवसभर चौकशी केल्यानंतर ईडीच्या पथकाने मंगळवारी .21 मार्च रोजी देखील त्यांची कसून चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्य स्तरावरील चौकशी समितीने छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील पंतप्रधान आवास योजनेच्या निविदा प्रक्रियेत मोठी अनियमितता झाल्याचा ठपका ठेवलेला आहे. या समितीच्या अहवालानंतर पालिकेने मुळ कंत्राटदारासह निविदा प्रक्रियेत सहभागी झालेल्या विविध कंपन्यांच्या 19 संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे कंपन्यांनी निविदा भरताना रिंग केली, एकाच आयपी ड्रेसवरून निविदा भरण्यात आल्याने पालिकेची फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांत दिलेली आहे. याची पोलिसांकडून चौकशी सुरू असतानाच हे प्रकरण केंद्राने इडीकडे सोपवले आहे. शुक्रवारी 17 मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर शहरात येऊन ईडीच्या पथकांनी विविध ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. सायंकाळी ईडीचे पथक पालिकेत देखील आले व चौकशीसाठी आवश्यक कागदपत्रे ताब्यात घेतली. त्यानंतर उपायुक्त तथा पंतप्रधान आवास योजनेच्या प्रकल्पप्रमुख अपर्णा थेटे यांना चौकशीसाठी मुंबईला हजर राहण्याचे समन्स बजावले. त्यानुसार अपर्णा थेटे या सोमवारी मुंबईतील इडी कार्यालयात हजर झाल्या. सोमवारी दिवसभर त्यांची कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर दुसर्या दिवशी मंगळवारी पुन्हा त्यांची दिवसभर चौकशी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. उपायुक्तांच्या चौकशीनंतर पालिकेतील घरकूल प्रकल्पाशी संबंधित इतर अधिकार्यांना देखील मुंबईला चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande