'खेळाडूंसोबत राष्ट्रवादी' अभियानाची जयंत पाटील यांच्याकडून घोषणा
मुंबई, 1 जून (हिं.स.) देशभरातील खेळासारख्या अत्यंत पवित्र क्षेत्रात कार्यरत व्यक्तींचे खचलेले मनोबल
'खेळाडूंसोबत राष्ट्रवादी' अभियानाची जयंत पाटील यांच्याकडून घोषणा


मुंबई, 1 जून (हिं.स.) देशभरातील खेळासारख्या अत्यंत पवित्र क्षेत्रात कार्यरत व्यक्तींचे खचलेले मनोबल सावरण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातील खेळाडूंशी राष्ट्रवादी काँग्रेस संवाद साधणार असून 'खेळाडूंसोबत राष्ट्रवादी' या अभियानाची सुरुवात करत असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी फेसबुक लाईव्हद्वारे केली.

या अभियानांतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष, तसेच माजी आमदार व पक्षाचे सर्व पदाधिकारी हे त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील तालुक्यात, जिल्हयातील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय राज्य आणि जिल्हा पातळीवरील विशेष कामगिरी बजावलेल्या खेळाडूंसोबत संवाद साधतील. यामध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय आपापल्या भागातील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य, जिल्हा पातळीवरील सहभाग दाखवलेल्या, व नोंदवलेल्या सर्व खेळाडूंची एकत्रित बैठक घ्यायची आहे. शिवाय त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या भावना समजून घ्यायच्या, त्यांचे मनोधैर्य वाढेल अशापध्दतीने त्यांना मदत करायची, संवाद साधायचा व याबैठकीमध्ये सध्या राष्ट्रीय पातळीवर खेळाच्याबाबतीत ज्या घटना घडल्या आहेत. त्याची माहिती संबंधित खेळाडूंना द्यायची व त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायची. यामध्ये महाराष्ट्र शासनाचे शिवछत्रपती पुरस्कार विजेते व अन्य पुरस्कार विजेते यांना प्राधान्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी बोलवावे. या बैठकीमध्ये झालेल्या संवादाचे इतिवृत्त व संवादाची थोडक्यात माहिती प्रदेश कार्यालयात कळवावी. खेळाडूंचे प्रश्न, समस्या आणि त्यांना दिल्लीत झालेल्या घटनेबद्दल भारतातील खेळाडूंचे मनोधैर्य खचले आहे, अशीही यंत्रणा वागू शकते याबाबतीत त्यांचे मनोधैर्य वाढवण्याचे काम करायचे आहे. ज्या खेळाडूंची भेट घ्याल त्यांचे फोटो, व्हिडीओ #NCPWithChampions या हॅशटॅगसह सोशल मिडियावर प्रसिद्ध करायचे आहे. ही बैठक ८ जूनच्या आतमध्ये घ्यावी असे सांगतानाच कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रातील खेळाडूंपर्यंत महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते पोचुया. देशात आणि महाराष्ट्रात शरद पवारसाहेबांनी नेहमीच खेळाडूंना आधार दिलाय. त्याचपध्दतीने मनोधैर्य घसरलेल्या महाराष्ट्रातील सर्व खेळाडूंना दिल्लीच्या घटनेमुळे मनावर झालेल्या मनोधैर्य उंचावण्याचे काम करुया. असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.

दिल्लीमध्ये राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंबाबत ज्या घटना घडल्या त्यामुळे देशात एकप्रकारची अस्वस्थता पसरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच देशातील आणि महाराष्ट्रातील खेळाडूंबरोबर आहे. आदरणीय शरद पवारसाहेब यांचा देशातील आणि राज्यातील खेळाडूंशी किती जिव्हाळ्याचा संपर्क आहे. क्रीडा क्षेत्रात पवारसाहेबांनी रचनात्मक कार्य केले आहे. क्रिकेट, खो खो, कबड्डी, कुस्ती असो या क्षेत्रातील खेळाडूंशी संवाद साधत उत्तमोत्तम खेळाडूंना पुढे येण्याची संधी निर्माण करुन देण्याचे काम केले आहे. अनेक कुस्तीगीर खेळाडू अडचणीच्या काळात पवारसाहेबांनी मदत करुन हात दिला. कारण ते आपल्या देशाचे नावलौकिक वाढवतात, देशासाठी पदके घेऊन येणार्या किंवा विशेष कामगिरी बजावली आहे त्यांच्याकडे पवारसाहेबांचे नेहमीच लक्ष असते असेही जयंत पाटील म्हणाले.

दुर्दैवाने दिल्लीत जो प्रकार घडतोय तो बघता महिला कुस्तीपटूंना फार वाईट वागणूक कुस्तीगीर परिषदेकडून मिळाली त्याबद्दल त्यांनी तक्रारी केल्या. लैंगिक शोषणाची तक्रार केली. मात्र तक्रार घेतली गेली नाही शेवटी कोर्टाने आदेश दिल्यावर तक्रार घेण्यात आली. देशातील कोणत्याही खेळाडूंवर अशाप्रकारची परिस्थिती निर्माण झाली नाही. गुन्हा दाखल करुनही कारवाई नाही. कारवाईची मागणी करणार्या या महिला कुस्तीपटूंवर आंदोलन करण्याची वेळ आली. नवीन संसदेचे उद्घाटन होत असताना आंदोलन करणार्या महिला कुस्तीपटूंवरच कारवाई करण्यात आली. या पदके मिळवलेल्या महिला कुस्तीपटूंचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावून कौतुक केले होते. त्याच महिला कुस्तीपटूंवर भाजपच्या खासदारावर आक्षेप घेतले म्हणून कारवाई करण्यात आली मात्र राष्ट्रवादी काँग्रेस या मुद्द्याचं राजकारण करु इच्छित नाही असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande