ठाणे, 1 ऑक्टोबर, (हिं.स.)। नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या वयस्करांच्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत ठाणेकर जलतरणपटूंनी चमकदार कामगीरी साधली आहे. त्यात २७ ठाणेकर जलतरणपटूंनी स्पर्धेत ११७ पदके जिंकून आपले वर्चस्व राखले. अजित मर्दे यांनी सहा सुवर्णपदके जिंकून पदकांचा षटकार ठोकला. अजित यांनी ४५ ते ४९ वयोगटात १०० मीटर फ्रीस्टाईल शर्यतीत १:१६;७० मिनिटे अशा कामगिरीसह अव्वल स्थान पटकावले.त्यानंतर १०० मीटर बटरफ्लाय शर्यतीत १:२७;१४ मिनिटे अशी वेळ नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला.या दुहेरी यशानंतर अजित मर्दे यांनी ५० मीटर बटरफ्लाय शर्यतीत ३३:६३ सेकंद अशी तर ५० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात ३२:१० सेकंद अशा वेळेसह सुवर्णपदके जिंकली. याशिवाय ४ बाय ५० मिडले रिले २:३५:७९ मिनिटे अशी वेळ साधत संघाला सुवर्णपदक जिंकून दिले. याच कामगिरीत सातत्य राखताना त्यांनी ४ बाय ५० मीटर फ्रीस्टाईल शर्यतीत २:२०:८० मिनिटे अशा कामगिरीसह पहिले स्थान मिळवले. अजित यांच्या जोडीने कुमार ढमाले यांनी आपल्या वयोगटात ४ बाय ५० मीटर फ्री स्टाईल शर्यतीत संघाला सुवर्णपदक जिंकून देण्यात मोलाची कामगिरी बजावली.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर