रत्नागिरीच्या स्वरा साखळकरला राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत दोन सुवर्णपदके
रत्नागिरी, 20 डिसेंबर, (हिं. स.) : गोव्यात झालेल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरीच्या स्वरा साखळकरला दोन सुवर्णपदके मिळाली. तायक्वांदो असोसिएशन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली गोवा तायक्वांदो असोसिएशनच्या सहकार्याने तायक्वांदो अॅकॅडमी ऑफ वास
स्वरा साखळकर


रत्नागिरी, 20 डिसेंबर, (हिं. स.) : गोव्यात झालेल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरीच्या स्वरा साखळकरला दोन सुवर्णपदके मिळाली.

तायक्वांदो असोसिएशन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली गोवा तायक्वांदो असोसिएशनच्या सहकार्याने तायक्वांदो अॅकॅडमी ऑफ वास्कोने राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा पेडम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इनडोर स्टेडियम पेडम म्हापसा येथे आयोजित केली होती. देशभरातून विविध राज्यांतून अनेक खेळाडू या स्पर्धेसाठी गोव्यामध्ये दाखल झाले होते. स्पर्धेत रत्नागिरीची सुवर्णकन्या आणी एसआरके तायक्वांदो संस्थेची खेळाडू स्वरा विकास साखळकर हिची कामगिरी उल्लेखनीय ठरली. जिल्हास्तरीय आणी राज्यस्तरीय स्पर्धेत कायम आपला ठसा उमटवणाऱ्या स्वराने राष्ट्रीय स्पर्धेत ही आपला दबदबा कायम ठेवला. सर्वप्रथम क्युरोगी प्रकारात आक्रमक खेळ करत तिने पहिल्या सुवर्णपदकाला गवसणी घातली, तर पुमसे प्रकारात नागालँडच्या मुलीचा पराभव करत दुसरे सुवर्णपदक आपल्या नावावर केले.

आजपर्यंत स्वरा हिने जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धेत एकूण ५२ पदके मिळवली आहेत. स्वरा ही दामले विद्यालयाची विद्यार्थिनी असून ती सहावीमध्ये शिकत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / बाळकृष्ण कोनकर


 rajesh pande