रत्नागिरी, 20 डिसेंबर, (हिं. स.) : मुंबई विद्यापीठाच्या व्हॉलिबॉल संघात रत्नागिरीतील वरुण वारसे याची आंतरविद्यापीठ स्पर्धेकरिता निवड झाली आहे.
मुंबईत मरीन लाइन्स स्पोर्ट्स पॅव्हिलियनमध्ये मुंबई विद्यापीठ पुरुष व्हॉलीबॉल संघ निवड चाचणी झाली. या चाचणीमधून नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ व्हॉलीबॉल राष्ट्रीय स्पर्धेकरिता मुंबई विद्यापीठाचा संघ निवडण्यात आला. त्यात रत्नागिरीच्या गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातील वरुण वारसे (प्रथम वर्ष कला) या विद्यार्थ्याची निवड झाली. त्याला महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे, प्रा. कल्पेश बोटके, मिनार कुरटे यांचे मार्गदर्शन लाभले.
---------------
हिंदुस्थान समाचार / बाळकृष्ण कोनकर