रत्नागिरीत रविवारी रोलर कोस्टर सायक्लोथॉन स्पर्धा
रत्नागिरी, 16 ऑक्टोबर, (हिं. स.) : रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे सलग दुसऱ्या वर्षी रोलर कोस्टर सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन येत्या रविवारी (दि. २० ऑक्टोबर) करण्यात आले आहे. हॉटेल विवेक येथे या स्पर्धेबाबत रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे पत्रकार परिषदेत
पत्रकारांना रोलर कोस्टर स्पर्धेची माहिती देताना


रत्नागिरी, 16 ऑक्टोबर, (हिं. स.) : रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे सलग दुसऱ्या वर्षी रोलर कोस्टर सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन येत्या रविवारी (दि. २० ऑक्टोबर) करण्यात आले आहे.

हॉटेल विवेक येथे या स्पर्धेबाबत रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. भाट्ये ते गावखडी आणि परत या मार्गावर होणाऱ्या या स्पर्धेत देशाच्या विविध भागांतून दोनशे सायकलिस्ट सहभागी होणार आहेत. पेडल फॉर बायोडायव्हर्सिटी अशी या स्पर्धेची संकल्पना असून कोकण कनेक्ट मूव्हमेंटची सुरवात या स्पर्धेने होणार आहे. निवडणूक आयोगाच्या स्वीप या कार्यक्रमाअंतर्गतही मतदार जनजागृतीसुद्धा या स्पर्धेच्या निमित्ताने केली जाणार आहे.

रोलर कोस्टर सायक्लोथॉन पॉवर्ड बाय हॉटेल विवेक या स्पर्धेसाठी सुवर्णसूर्य फाउंडेशन, लायन्स क्बब ऑफ रत्नागिरी, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बॅंक, महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालय, भारत निवडणूक आयोग, जय हनुमान मित्रमंडळ, दीपक पवार यांच्याकडून विशेष मार्गदर्शन, सहकार्य लाभले आहे. स्पर्धेच्या मार्गावर सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्ते सुस्थितीत ठेवण्याकरिता विशेष लक्ष दिले आहे. मार्गावरील सर्व ग्रामपंचायती आणि शाळांनी महत्त्वाचे सहकार्य केले आहे. रत्नागिरीकरांनी ही स्पर्धा पाहण्यासाठी आवर्जून यावे, असे आवाहन क्लबतर्फे करण्यात आले आहे.

ही स्पर्धा सकाळी साडेसहा वाजता भाट्ये येथून सुरू होणार आहे. कसोप, फणसोप, वायंगणी, गोळप, पावस, मेर्वी, गावखडी या मार्गावरून पुन्हा याच मार्गाने भाट्ये येथे स्पर्धा संपेल. साधारण ४८ किलोमीटरचे हे अंतर असून यात राज्यभरातून नामवंत सायकलपटू सहभागी होणार आहेत. स्पर्धेत पुरुष, महिलांचे वेगवेगळे गट केले असून त्यामध्ये जवळपास १ लाख १० हजारांची बक्षिसे, ट्रॉफी देण्यात येतील. जे सायकलिस्ट सायक्लोथॉन पूर्ण करतील, त्यांना आकर्षक फिनिशर मेडल देऊन कौतुक करण्यात येणार आहे.

येत्या ५ जानेवारीला सलग दुसऱ्या वर्षी रत्नागिरी कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन आणि मार्चमध्ये अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. रत्नागिरीमध्ये पर्यटन वाढले पाहिजे, याकरिता ही स्पर्धा महत्त्वाची ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / बाळकृष्ण कोनकर


 rajesh pande