तेलअवीव, 02 ऑक्टोबर
(हिं.स.) :
इराणने मंगळवारी रात्री इस्त्रायलवर 180
बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला चढवला. यापैकी बहुतांश क्षेपणास्त्र इस्त्रायलने
मिसाईल डिफेन्स सिस्टीमच्या मदतीने हवेतच नष्ट केली. त्यामुळे या हल्ल्यात
कुणालाही फारशी इजा झाली नसल्याचे इस्त्रायल डिफेन्स सर्व्हिसेसने (आयडीएफ)
म्हंटले आहे. दरम्यान इराणच्या या हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल असा
इशारा इस्त्रायलने दिला आहे. दरम्यान या घटनाक्रमामुळे संपूर्ण पश्चिम आशियात
प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.
इस्रायलवरील
हल्ल्यानंतर इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पझाकियान म्हणाले की, आम्ही इस्रायलच्या
आक्रमणाला प्रत्युत्तर दिले आहे. इराणचे हित आणि नागरिकांचे रक्षण करण्यासाठी हे
आवश्यक होते. तर इराणच्या हल्ल्यानंतर इस्त्रायलचे पंतप्रधान बेंझामिन नेतन्याहू
म्हणाले की, इराणला या हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी लागेल. या
हल्ल्यांना नक्कीच प्रत्युत्तर दिले जाईल. इस्रायल
आपल्या शत्रूंचा बदला घेतल्याविना राहत नाही. परंतु
इराणला हे समजत नाही. पण आता त्यांना हे समजेल की आम्ही बनवलेल्या नियमांना चिकटून
राहू. जो कोणी आमच्यावर हल्ला करेल, आम्ही त्याच्यावर हल्ला करू असे नेतन्याहू यांनी
ठणकावले हे. दरम्यान इस्त्रायलवरील हल्ल्यानंतर अमेरिकेतही मोठे घटनाक्रम घडले
आहेत. अमेरिकेचे
राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी राष्ट्रीय सुरक्षा दलाची
बैठक घेतली. यानंतर बायडेन यांनी सैन्याला इराणच्या हल्ल्यांपासून इस्रायलचे
संरक्षण करण्यास आणि इस्रायलच्या दिशेने डागलेली क्षेपणास्त्रे खाली पाडण्यास
सांगितले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष
बायडेन यांनी सांगितले की, अमेरिकन
सैन्य इस्रायलचे संरक्षण करेल. सध्या आम्ही परिस्थितीचा आढावा घेत आहोत, आतापर्यंत आम्हाला कळले आहे की इराणचा हा हल्ला
पूर्णपणे अपयशी ठरल्याचे बायडेन म्हणालेत.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी