कझान, 23 ऑक्टोबर (हिं.स.) - रशियातील कझान येथे सुरू असलेल्या ब्रिक्स परिषदेचा आज दुसरा दिवस होता. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात चर्चा झाली. 2020 मध्ये गलवान संघर्षानंतर दोन्ही नेत्यांमधील ही पहिली द्विपक्षीय बैठक होती. या बैठकीच्या माध्यमातून आम्ही पाच वर्षांनंतर औपचारिकपणे भेटत आहोत. गेल्या चार वर्षांत सीमेवर निर्माण झालेल्या समस्यांवर जे एकमत झाले आहे, त्याचे आम्ही स्वागत करतो. सीमेवर शांतता राखणे हे आपले प्राधान्य असले पाहिजे, असेही मोदी म्हणाले. तसेच दोन्ही देशांनी आपले मतभेद योग्य पद्धतीने हाताळले पाहिजेत. भारत आणि चीनने संबंध सामान्य ठेवण्यासाठी एकमेकांसोबत काम केले पाहिजे. तरच दोन्ही देश विकासाचे लक्ष्य गाठू शकतील, असे जिनपिंग म्हणाले.
मोदी-जिनपिंग चर्चेनंतर भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ब्रिक्स बैठकीच्या बाहेर दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 50 मिनिटे चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी पाच वर्षांनी एकमेकांशी चर्चा केली आहे. दोन्ही देशांच्या नेत्यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्ती कराराचे स्वागत केले आहे. तसेच दोन्ही देशांमधील समस्या सोडवण्यासाठी विशेष प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये भारताकडून सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, तर चीनकडून परराष्ट्र मंत्री वांग यी हे असतील. या दोघांची लवकरच औपचारिक बैठक होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी