
इस्लामाबाद , 18 डिसेंबर (हिं.स.)।भारताची गुप्तहेर थ्रिलर चित्रपट ‘धुरंधर’ ची क्रेझ आता पाकिस्तानमध्येहि दिसत आहे. विशेष बाब म्हणजे,पाकिस्तानमध्ये या चित्रपटावर अधिकृत बंदी असतानाही ही लोकप्रियता वाढताना दिसते आहे. एकीकडे काही पाकिस्तानी राजकारणी कथित “पाकिस्तानविरोधी” भूमिकेमुळे या चित्रपटाविरोधात एफआयआर दाखल करत आहेत, तर दुसरीकडे या चित्रपटातील व्हायरल गाणे ‘FA9LA’ संपूर्ण पाकिस्तानमधील पार्ट्यांमध्ये वाजत आहे. या गाण्याचा आनंद पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) चे प्रमुख बिलावल भुट्टो यांनीही घेतलेला दिसत आहे.
अलीकडेच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या एका पार्टीमध्ये हे गाणे वाजत असल्याचे दिसते. विशेष म्हणजे, त्या वेळी पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) चे प्रमुख बिलावल भुट्टो देखील मंचावर उपस्थित होते. हे गाणे बहरीनचे कलाकार नवाफ फहेद ऊर्फ ‘फ्लिपेराची’ यांनी गायले आहे. या व्हिडिओ क्लिपमध्ये बिलावल भुट्टो यांचे मंचावर स्वागत केले जाते आणि ते आसनावर बसतात. त्याच वेळी पार्श्वसंगीतात ‘धुरंधर’ चित्रपटातील FA9LA हे गाणे वाजत असते. म्हणजेच, पाकिस्तानमध्ये बंदी असलेल्या या गाण्याचा आनंद खुद्द भुट्टोही घेत असल्याचे दिसून येते.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, बिलावल भुट्टो यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान पीपल्स पार्टीनेच कराचीतील एका न्यायालयात चित्रपट ‘धुरंधर’विरोधात कायदेशीर आव्हान दाखल केले आहे. या पक्षाने चित्रपटात दिवंगत नेत्या बेनजीर भुट्टो यांच्या छायाचित्रांचा वापर केल्याबाबत आक्षेप घेतला आहे. न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत चित्रपटाच्या कलाकार आणि निर्मिती पथकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.पाकिस्तानसह काही आखाती देशांनी कथित “नकारात्मक प्रचार” केल्याचा आरोप करत ‘धुरंधर’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे. मात्र वास्तव असे आहे की, जगभरातील बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची कमाई अजूनही थांबण्याचे नाव घेत नाही. हे गाणे चित्रपटातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या पात्रांपैकी एक असलेल्या रहमान डकैत या व्यक्तिरेखेशी संबंधित आहे, जी अभिनेता अक्षय खन्ना यांनी साकारली आहे.
--------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode