कोल्हापूर, 26 ऑक्टोबर (हिं.स.)।
महाराष्ट्रातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने ठिकठिकाणी स्थिर पथके, भरारी पथके तसेच कायमस्वरूपी तपासणी नाके कार्यरत आहेत. पारदर्शक, निपक्ष वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तपासणी नाके व फिरत्या पथकांनी अवैध वाहतूक रोखण्यासाठी संशयित वाहनांची अजून कसून तपासणी करावी, असे निर्देश राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी दिले. त्यांनी कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक प्रक्रियेसंबंधी सर्व नोडल अधिकाऱ्यांचा आढावा घेतला.
ते म्हणाले, अवैध रोख रक्कम, साहित्य तसेच मद्य जप्त करण्याची प्रकरणे शोधण्यासाठी सर्व क्षेत्रिय पथकांनी काम करावे. संशयित सर्व वाहनांची कसून तपासणी करून काही आढळल्यास तात्काळ कारवाई करावी. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, आयुक्त सी-जीएसटी संजय सोमकुंवार, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, श्रीम.किरण कुलकर्णी, अति.पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे, दिपाली शेलार पुजारी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह इतर सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.
यावेळी डॉ. कुलकर्णी म्हणाले, अनाधिकृत रक्कम, मद्य तसेच वस्तू जप्त केल्यानंतर ते कोणत्या ठिकाणाहून आले तसेच कोणासाठी जात आहे हे तपासून त्यांच्यावरही कारवाई करावी. या अनुषंगिक प्रत्येक घटनेच्या मुळापर्यंत पोहचून कारवाई करा. निवडणूक काळात प्रत्येक नियुक्त अधिकारी कर्मचारी मग ते कोणत्याही विभागाचे असो त्यांना विशेषाधिकार प्राप्त होतात. त्यामूळे पोलीस, महसूल, राज्य उत्पादन शुल्क, आयकर, जीएसटी, वन विभाग तसेच राज्य परिवहन यांनी समन्वयाने एकत्रित तपासणी मोहिम राबवून एकमेकांना माहितीचे आदान प्रदान करावे. यातील कोणालाही अवैध रक्कम, मद्य किंवा वाटप करण्यासाठी निघालेल्या वस्तू मिळाल्यास त्या वाहनाला ताब्यात घेवून पुढिल चौकशी करावी. तसेच तथ्य आढळल्यास मिळालेले साहित्य जप्त करावे. तपासणी नाके व फिरत्या पथकांनी अजून कसून तपासणी करावी. जिल्ह्यातील महत्त्वाच्या मतदारसंघात विशेष मोहिम राबवून प्रत्येक हालचालीवर बारकाईने नजर ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. आढाव्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याने निवडणूक अनुषंगिक कामांची समाधानकारक तयारी केल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
तर कोल्हापूर जिल्ह्याचा विशेष सन्मान करणार
कोल्हापूर जिल्ह्याचे 80 टक्क्यांहून अधिक मतदानाचे उद्दीष्ट असून त्यानूसार कामकाज सुरू असल्याचे सांगून सर्व विभागांमार्फत केलेल्या नियोजनाचे त्यांनी कौतुक केले. ते म्हणाले, कोल्हापूरसाठी हे उद्दीष्ट शक्य असून जर 80 टक्क्यांहून अधिक मतदानाची उद्दीष्टपूर्ती झाली तर, मी जिल्ह्याचा विशेष सन्मान करणार. मतदान प्रक्रियेबाबत जिल्हयात चांगले वातावरण असून सामाजिक माध्यमे व वृत्तपत्र माध्यमांमधून ते अधोरेखित होत असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील मतदारांसाठी राबविण्यात येत असलेल्या जनजागृती कार्यक्रमालाही सहभाग वाढीसाठी प्रयत्न करावेत असे त्यांनी यावेळी सांगितले.
माध्यम कक्ष, तक्रार निवारण कक्षाच्या कामकाजाची केली पाहणी
कुलकर्णी यांनी आज माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती कक्षाला भेट देऊन येथील कामकाजाचा आढावा घेतला. विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांशी संबंधित पेड न्यूज तसेच चुकीच्या व अफवा पसरवणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेवा. कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या बातम्यांच्या पोस्ट सोशल मीडियातून प्रसिध्द होणार नाहीत, याची खबरदारी घ्या. ईव्हीएम मशीनच्या विश्वासार्हतेबाबत शंका निर्माण करणाऱ्या चुकीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यास संबंधितांना तात्काळ नोटीस द्या, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच तक्रार निवारण कक्षातील कामकाजाचाही त्यांनी भेट देवून आढावा घेतला.
हिंदुस्थान समाचार / मेघा माने