सिंधुदुर्ग, 30 ऑक्टोबर (हिं.स.)। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी मतदारसंघासाठी दाखल केलेल्या अर्जाची छाननी प्रक्रिया आज पार पडली. यात १४ पैकी ५ उमेदवारी अर्ज अवैध तर ९ उमेदवारी अर्ज वैध ठरले. अवैद्य अर्जात शेतकरी संघटनेच्या प्रवीण परब यांच्यासह अपक्ष उमेदवार दत्ताराम गावकर यांच्या अर्जाचा समावेश आहे तर अन्य अर्ज डमी होते. येत्या ४ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असून त्यानंतरचनेमके कितीजण निवडणूक रिंगणात कायम राहतात हे चित्र स्पष्ट होणार आहे.
सावंतवाडी विधानसभा निवडणुकीसाठी दहा जणांनी एकूण १४ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्या अर्जांची छाननी आज निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत निकम यांच्या कार्यालयात पार पडली. यावेळी तहसीलदार श्रीधर पाटील उपस्थित होते. तर महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांचे प्रतिनिधी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई, महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली, प्रथमेश तेली, अपक्ष उमेदवार यशवंत पेडणेकर, दत्ताराम गावकर, प्रवीण परब, अर्चना घारे यांचे प्रतिनिधी देवा टेमकर आदी उपस्थित होते. या प्रक्रियेवेळी कोणीही कोणाच्याही उमेदवारीवर हरकत घेतली नाही मात्र तांत्रिक बाबींमुळे पाच उमेदवारी अर्ज अवैध ठरले.
यात अर्चना घारे परब यांनी राष्ट्रवादी पक्षातर्फे दाखल केलेला उमेदवारी अर्ज एबी फॉर्म नसल्याने अवैध ठरला. तर त्यांनी सादर केलेले दोन्ही अपक्ष उमेदवारी अर्ज मात्र वैध ठरले. महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी पक्षातर्फे सादर केलेले दोन्ही अर्ज वैध ठरले. महा विकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांनी पक्षातर्फे व अपक्ष मिळून भरलेले दोन्ही अर्ज वैध ठरले. तर केसरकर यांच्यातर्फे त्यांची मुलगी सोनाली केसरकर तिने भरलेला डमी अर्ज एबी फॉर्म अभावी अवैध ठरला. तसेच प्रथमेश तेली यांचाही अर्ज एबी फॉर्म अभावी अवैध ठरला. अपक्ष उमेदवार दत्ताराम गांवकर यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरला. तर यशवंत उर्फ सुनील पेडणेकर यांचाही अर्ज वैध ठरला. तर शेतकरी संघटनेचे उमेदवार प्रवीण बाबली परब यांनी आपल्या अर्जासोबत आवश्यक असलेले १० सूचक न दिल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत अवैध झाला. तसेच दुसरे अपक्ष उमेदवार देवदत्त गावडे यांनी १० सूचक दिलेले असताना त्यांच्या एका सूचकाचे नाव मतदार यादीत आढळून आले नसल्याने त्यांचाही अर्ज अवैध ठरला.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी उपस्थित उमेदवार तसेच उमेदवारांच्या प्रतिनिधींना काही सूचना केल्या. यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ४ नोव्हेंबर असून दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. प्रचार सभेसाठी प्रत्येक उमेदवाराला आपला प्रतिनिधी नेमणे गरजेचे असून त्याच्या मार्फत मैदानाची वा तत्सम जागेची परवानगी प्रचार सभेपूर्वी ४८ तास आधी अर्ज करून घेता येईल. मात्र सामंजस्य दाखवून प्रत्येक उमेदवाराला प्रचार सभा घेण्याची संधी द्यावी. कोणीही कुणाची उगाच अडवणूक करू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी उपस्थित उमेदवार तसेच त्यांच्या प्रतिनिधींनी निवडणूक शांततेच्या वातावरणात पार पाडली जावी. कोणत्याही बाबत संघर्ष टोकाला जाऊ नये यासाठी उमेदवारांनी तसेच प्रशासनाने ही योग्य काळजी घ्यावी. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / निलेश जोशी