मिर्झापूर, 04 ऑक्टोबर (हिं.स.) : उत्तरप्रदेशच्या मिर्झापूर जिल्ह्यात गुरुवारी रात्री उशिरा जीटी रोडवरील कटका गावाजवळ ट्रकच्या धडकेत 10 जणांचा मृत्यू झाला. या ट्रकने भदोही जिल्ह्यातून बनारसला जाणाऱ्या ट्रॅक्टरला मागून धडक दिली. ट्रॅक्टरमध्ये 13 जण होते. या अपघातात ट्रॅक्टरमधील 10 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झाले आहेत.
मिर्झापूरचे पोलीस अधीक्षक अभिनंदन यांनी सांगितले की, रात्री 1 वाजेच्या सुमारास मिर्झा मुराद कांचवा सीमेवर रस्ता अपघात झाल्याची माहिती मिळाली. भदोही जिल्ह्यातून 13 जणांना घेऊन बनारसला जात असलेल्या ट्रॅक्टरला एका अनियंत्रित ट्रकने मागून धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. यात ट्रॅक्टरस्वार 13 जणांपैकी 10 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त 13 जण भदोही जिल्ह्यात मजूर म्हणून काम करायचे. मृतकांमध्ये भानू प्रताप, अनिल कुमार, सूरज, विकास, नानक, नितीन, मुन्ना, तेरू, सनोहर, प्रेम शंकर यांचा समावेश आहे. तर जखमी झालेल्या 3 जणांमध्ये जमुनी, आकाश आणि जय यांचा समावेश असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी