कोल्हापूर, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। कोल्हापुरला ऐतिहासिक परंपरा असून येथील संस्कृती, आपली वैशिष्ट्ये, येथील विजयादशमीची ऐतिहासिक परंपरा शाही दसरा महोत्सवातून जगभर पोहोचेल, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर हसन मुश्रीफ यांनी केले. ऐतिहासिक भवानी मंडप परिसरात पर्यटन विभाग महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासनामार्फत आयोजित शाही दसरा महोत्सव २०२४ च्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
ते म्हणाले, देश आणि जगभरातून आलेल्या पर्यटकांना विजयादशमीचे महत्त्व कळावे यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापुरची वैशिष्ट्ये लोकांना पाहण्याची सुवर्ण संधी यातून मिळेल.पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी येणारे १० दिवस सर्व जिल्हावासियांना भक्तीभावाचे जावेत यासाठी शुभेच्छा दिल्या. ते पुढे म्हणाले, येणाऱ्या भाविकांना, पर्यटकांना प्रशासनाकडून चांगल्या सुविधा देण्यात येणार आहेत. संपूर्ण नवरात्रोत्सवात अनेक कार्यक्रमांचे आयोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले असून नागरिक तसेच पर्यटकांनी त्याचा लाभ घ्यावा. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
नवरात्र उत्सव खऱ्या अर्थाने महोत्सव होण्यासाठी मिळून प्रयत्न करावेत – छत्रपती शाहू महाराज
येणाऱ्या नवरात्रोत्सवाबाबत सर्वांना छत्रपती शाहू महाराज यांनी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, येणारा उत्सव भक्तीभावाने साजरा करून तो खऱ्या अर्थाने महोत्सव होण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत. उत्सव सर्वत्र पोहोचण्यासाठी काम करावे. शेकडो वर्षांपासून हा दसरा महोत्सव सुरू आहे. त्यामध्ये दरवर्षी नवनवीन कार्यक्रमांचा समावेश केल्याने त्याला नाविन्यता मिळत आहे. दर्शन सुविधाही अधिक चांगल्या केलेल्या असून प्रशासनाकडून चांगले काम झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याबाबत त्यांनी सर्वांचे अभिनंदनही केले.
कोल्हापूरच्या दसऱ्याला ऐतिहासिक महत्व असून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध सांस्कृतिक, ऐतिहासिक, शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दसरा महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रास्ताविकात केले.
यावेळी रिमोटची कळ दाबून शाही दसरा महोत्सवाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मेन राजाराम हायस्कूल इमारतीमध्ये भरविण्यात आलेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन छत्रपती शाहू महाराज आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. तर शिवाजी विद्यापीठ व शासकीय मुद्रणालया मार्फत भरविण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी कोल्हापूर जिल्हयातील एतिहासिक परंपरा सांगणाऱ्या चित्रफितीचे अनावरनही करण्यात आले.
हिंदुस्थान समाचार / मेघा माने