
रत्नागिरी, 22 डिसेंबर, (हिं. स.) : मिशन जीवनअंतर्गत विशेष उपक्रमामध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील पाच पोलिस पाटलांचा सन्मान करण्यात आला.
निरूळ पोलीस पाटील अपर्णा निरूळकर, नाखरेतील सुधीर डाळिंबे, गणेशगुळ्यातील संतोष लाड, डोर्लेतील कल्याणी हळदवणेकर आणि कुर्धे येथील वैभव शिंदे या पोलीस पाटलांचा सन्मान करण्यात आला.
पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या पाच गावांमध्ये या पोलीस पाटलांनी ज्येष्ठ नागरिकांची माहिती घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांना योग्य तन्हेने मदत केल्याने त्यांना गावामध्ये काळजी घेणारा एक हक्काचा माणूस सापडल्याबद्दल ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले. त्याचबरोबर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवस साजरे करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
गावामध्ये पोलीस पाटील म्हणून काम करत असताना नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्याचे काम सातत्याने केले जाते. त्यामुळे नागरिकांमध्ये पोलीस पाटलांबद्दल विश्वासाचे नाते तयार झाल्यामुळे प्रत्येकजण आपल्या अडीअडचणी मांडत असतात. त्या सोडवण्याचे काम केले जाते, असे डोर्लेच्या पोलीस पाटील कल्याणी हळदवणेकर यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी