लातूर, 4 ऑक्टोबर (हिं.स.)।मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या काही पात्र महिलांच्या बँक खात्याला आधार क्रमांक संलग्न नसल्याने त्यांच्या बँक खात्यात योजनेची रक्कम जमा झालेली नाही. अशा महिलांच्या बँक खात्यांना आधार क्रमांक संलग्न (आधार सीडिंग) करण्याची कार्यवाही दोन दिवसात पूर्ण करावी. यासाठी संबंधित शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि बँक अधिकारी यांनी समन्वयाने काम करावे. या कामाला प्राधान्य द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय बँकर्स समितीच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.
बँक खात्याला आधार क्रमांक संलग्न नसलेल्या महिलांची यादी संबंधित अंगणवाडी सेविकेकडे पाठविण्यात आली आहे. तसेच संबंधित महिलांना बँकेत जावून आधार क्रमांक बँक खात्याला संलग्न करण्याबाबत माहिती देण्यात आली आहे. या महिला बँकेत आल्यानंतर बँकेतील अधिकारी, कर्मचारी यांनी आधार संलग्न करण्याची कार्यवाही प्राधान्याने करावी, असे जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे म्हणाल्या. तसेच शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांचे कर्ज प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्यावर बँकांनी तातडीने कार्यवाही करावी. तसेच संबंधित शासकीय विभाग आणि बँकांनी समन्वयाने काम करून हे प्रस्ताव लवकरात लवकर निकाली निघण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्याला आधार संलग्न करण्याची कार्यवाही वेगाने पूर्ण होणे आवश्यक आहे. यासाठी पुढील दोन दिवस बँकांनी विशेष मोहीम राबवून काम करावे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी सांगितले.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जावेद शेख यांनी आधार संलग्न नसलेल्या लाभार्थ्यांची तालुकानिहाय आकडेवारी सांगितली. जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, मत्स्यव्यवसाय विभाग, पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा यावेळी आढावा घेण्यात आला.
हिंदुस्थान समाचार / मेघा माने