
छत्रपती संभाजीनगर, 05 फेब्रुवारी (हिं.स.)।
इस्त्राईलसारख्या अवर्षणग्रस्त देशाने शेती व पूरक उद्योगासंदर्भात शाश्वत विकासाचे मॉडेल विकसित करून जगासमोर एक आदर्श ठेवला. जैविक विविधतेने नटलेल्या भारताने देखील अशा प्रकारचे पर्यावरणस्नेही मॉडेल विकसीत करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.दिनेश कुमार अस्वाल यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदार्थविज्ञान विभागाच्या वतीने 'इनोव्हेशन इन मटेरियल्स सायन्स फॉर सस्टेनेबल फ्युचर' या विषयावरील परिषदेचे उदघाटन करण्यात आले. विभागातील वरिष्ठ प्राध्यापक तथा विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.महेंद्र सिरसाठ यांच्या गौरवार्थ आयोजन करण्यात आले आहे. कुलगुरु डॉ.विजय फुलारी अध्यक्षतेखाली नाट्यगृहात हा कार्यक्र्म झाला. यावेळी प्रा.री.ईची मुराकामी (जपान), प्रा.मेंग लीन टीसाई (तैवान), अधिष्ठाता डॉ.एम.डी.शिरसाठ, सुनीता शिरसाठ, विभागप्रमुख डॉ.प्रवीणा उगीले, कन्व्हेनर डॉ.बी.एन.डोळे, सचिव डॉ प्रभाकर उंदरे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी डॉ.महेंद्र शिरसाठ यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सन्मानपत्र देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला उद्घाटप्रसंगी डॉ.डी.के.अस्वाल म्हणाले, भारतात उन्हाळयात उष्णता व पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. तर पावसाळ्यात अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागते. तसेच हिवाळ्यात हिमवृष्टी होते. या सर्व बाबींचा विचार करुन संशोधक, शास्त्रज्ञांनी मूलभूत व उपयोजित संशोधन करणे गरजेचे आहे. इस्त्राईलने वाळवंटात नंदनवन फुलविले, तेथील भाजीपाला व फळांना जगभर मागणी आहे. भारताने देखील असेच शाश्वत पर्यावरणस्नेही मॉडेल विकसीत करावे. डॉ.शिरसाठ यांनी ’मटेरियल सायन्स’ या क्षेत्रात दिलेले योगदान अत्यंत महत्वाचे असून युवा संशोधकांनी त्यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहनही केले.
अध्यापक, संशोधक विद्यार्थ्यामध्ये डॉ.महेंद्र शिरसाठ यांच्याप्रमाणे जिद्द, चिकाटी व समर्पण असणे गरजेचे आहे, असे कुलगुरु डॉ.विजय फुलारी म्हणाले. प्रा.एस.एस.हुसेनी व डॉ.रुपाली कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. परिषदेत देशविदेशातील ४७५ संशोधकांनी सहभाग घेतला आहे.
पदार्थविज्ञान विभागातील वरिष्ठ प्राध्यापक तथा विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.महेंद्र सिरसाठ हे साडेतीन दशकांच्या सेवेनंतर येत्या मे महिन्यात सेवानिवृत्त होत आहेत. पदार्थविज्ञान व इलेक्ट्रॉनिक्स विभागप्रमुख, संचालक डीडीयुकेके, अकॅडमिक संचालक स्टाफ कॉलेज, कुलसचिव आदी पदांवर त्यांनी कार्य केले आहे. तसेच ३२० शोधनिबंध परिषदेत प्रकाशित झाले आहे.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis