ठाणे, 4 ऑक्टोबर, (हिं.स.)। गत अनेक वर्षांपासून कळवा, मुंब्रा परिसरातील विसर्जन घाटावर मुर्ती विसर्जनाची सेवा करणा-या स्थानिक भूमीपुत्रांना तात्काळ विमा संरक्षण आणि योग्य त्या सुख सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात अशी मागणी, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस व अल्पसंख्यांक निरीक्षक नजीब मुल्ला यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रामधील १४९ मुंब्रा-कळवा विधानसभा मतदार संघामध्ये कळवा, मुंब्रा परिसरामध्ये येथे अनेक ठिकाणी विसर्जन घाट अस्तित्वात आहेत. या विसर्जन घाटांवर वर्षांनुवर्षे ठाणे, कळवा, मुंब्रा तसेच आजूबाजूच्या शहरातील हजारोंच्या संख्येने गणेश मुर्ती आणि देवी मुर्तींचे विसर्जन केले जाते. रेतीबंदर विसर्जन घाटावर मुंबई उपनगरामधील देखील अनेक गणेश मुर्ती विसर्जनासाठी आणण्यात येतात. येथील विसर्जन घाटावर कळवा, खारीगांव, रेतीबंदर परिसरातील स्थानिक भूमीपुत्र गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सव तसेच नवरात्र उत्सव कालावधीमध्ये मुर्ती विसर्जनाची विनामूल्य सेवा करीत आहेत. परंतु मुर्ती विसर्जन करणा-यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून कोणतीही व्यवस्था नसल्याचे दिसून येते.
विसर्जनासाठी येणा-या काही मुर्ती या मोठ-मोठ्या असतात. या मुर्ती विसर्जन करणा-या युवकांना सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कुठलीही व्यवस्था तसेच कोणतेही विमा संरक्षण नसते. त्यामुळे दुर्देवाने त्या ठिकाणी एखादा अपघात घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार ? हा प्रश्न उपस्थित होते. या स्थानिक भूमीपुत्रांसाठी पाणी, नाश्ता, जेवण याची देखिल व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात येत नसल्याच्या अनेक तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्या आहेत. शारदिय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. देवी विसर्जनाच्या दिवशी देखिल कळवा, मुंब्रा परिसरातील तसेच रेतीबंदर विसर्जन घाटावर मोठ्या संख्येने देवींच्या मुर्ती विसर्जनासाठी येतील. गेली अनेक वर्षे रेतीबंदर विसर्जन घाटावर गणेश मुर्ती तसेच देवी मुर्तींचे विसर्जन करणा-या स्थानिक भूमीपुत्रांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्यांना विमा संरक्षण आणि योग्य त्या सुख सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत आपण तत्काळ पाऊले उचलावीत अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस व अल्पसंख्यांक निरीक्षक नजीब मुल्ला यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर