
रायगड, 21 डिसेंबर (हिं.स.)माथेरान नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अंतिम निकालात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार चंद्रकांत चौधरी यांनी १०६९ मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह माथेरान नगरपरिषदेवर शिवसेना शिंदे गटाचे स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.
सात प्रभागांतील निवडणूक निकालांमध्ये शिंदे गटाच्या उमेदवारांनी बहुसंख्य जागांवर विजय मिळवून सत्ता स्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ मिळवले होते. त्यानंतर झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत चंद्रकांत चौधरी यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत नगराध्यक्षपदावर आपली मोहोर उमटवली.
या निकालामुळे माथेरानच्या स्थानिक राजकारणात शिवसेना शिंदे गटाचे बळ अधिक मजबूत झाले असून विरोधी पक्षांना मोठा धक्का बसला आहे. विजय जाहीर होताच शिवसैनिकांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला.
नवनिर्वाचित नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी नागरिकांचे आभार मानत, माथेरानच्या विकासासाठी प्राधान्याने काम करणार असल्याची ग्वाही दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके