पाकिस्तानात कुर्रम जिल्ह्यात भीषण दहशतवादी हल्ला; ४० हून अधिक ठार
खैबर पख्तुनख्वा, २१ नोव्हेंबर (हिं.स.) : पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील कुर्रम जिल्ह्यात ओचट भागात दहशतवाद्यांनी प्रवासी वाहनांच्या ताफ्यावर भीषण गोळीबार केला. या हल्ल्यात ४० हून अधिक जण ठार झाल्याची माहिती आहे. मृतांमध्ये ६ महिला आणि लहान
पाकिस्तानात हल्ला


खैबर पख्तुनख्वा, २१ नोव्हेंबर (हिं.स.) : पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील कुर्रम जिल्ह्यात ओचट भागात दहशतवाद्यांनी प्रवासी वाहनांच्या ताफ्यावर भीषण गोळीबार केला. या हल्ल्यात ४० हून अधिक जण ठार झाल्याची माहिती आहे. मृतांमध्ये ६ महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. घटनेनंतर पोलिस आणि लष्करी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत रस्ता मोकळा करत बचाव आणि मदतकार्य सुरू केले. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असून अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.

कुर्रम पोलिसांच्या मते, पाराचिनारहून पेशावरकडे जाणाऱ्या प्रवासी वाहनांच्या ताफ्यावर हा हल्ला झाला. एक पाराचिनारकडे आणि दुसरा पेशावरकडे अशी दोन वाहने प्रवास करत होती. अचानक सशस्त्र दहशतवाद्यांनी या वाहनांवर गोळीबार केला. हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तहसील मुख्यालय रुग्णालय अलिझाईचे प्रमुख डॉ. घायोर हुसैन यांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे. प्रशासनाने जखमींवर तत्काळ उपचार सुरू केले आहेत. दरम्यान, लष्कर आणि पोलीस स्थानिक जमातींना शांतता राखण्याचे आवाहन करत आहेत.

कुर्रम जिल्हा अफगाणिस्तानच्या सीमेला लागून आहे. तिथे गेल्या काही महिन्यांत विविध जमाती आणि गटांमधील सशस्त्र संघर्षांमुळे तणाव वाढला आहे. शिया आणि सुन्नी मुस्लिमांमधील जुन्या जमिनीच्या वादामुळेही परिसरात सतत अशांतता असते. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही गटाने स्वीकारलेली नाही.

घटनेनंतर पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांबद्दल शोक व्यक्त केला आणि अशा घटनांना जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीने (पीपीपी) आपल्या निवेदनात या घटनेला भ्याड व अमानवी कृत्य संबोधले आहे.

दहशतवादाचा विळखा वाढत असताना कुर्रमसारख्या संवेदनशील भागांतील अशा घटनांमुळे पाकिस्तानच्या सुरक्षायंत्रणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा हल्ल्यांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

हिंदुस्थान समाचार / Shuddhodana Mangorao


 rajesh pande