तेलअवीव, 26 डिसेंबर (हिं.स.)।इस्त्रायलचे संरक्षणमंत्री इस्त्रायल कॅट्झ यांनी गाझा-इजिप्त सीमेवरील बफर झोनचा बुधवारी दौरा केला. यावेळी आपले सैन्य (इस्रायल डिफेंस फोर्सेस) गाझामध्ये तैनात राहतील आणि पॅलेस्टाईन भागावरील सुरक्षा नियंत्रण कायम ठेवतील, असे इस्त्रायलचे संरक्षणमंत्री इस्त्रायल कॅट्झ यांनी स्पष्ट केले आहे.त्यांच्या या विधानामुळे इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धविरामाच्या चर्चेच्या यशावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
इस्त्रायल कॅट्झ म्हणाले कि, इस्रायली सेन्य गाझा पट्टीमध्ये सुरक्षा क्षेत्र आणि बफर क्षेत्रात नियंत्रणाच्या स्थितीत राहील. हे इस्रायली समुदायाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाचे आहे. येथे कुठलेही हमास सरकार असणार नाही ना हमास सेन्य असेल. सुरू असलेल्या लढाईनंतर, एक नवे वास्तव समोर येईल. यापूर्वी इस्त्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे कार्यालय आणि हमासने एकमेकांवर गाझा युद्धविराम करारावर पोहोचण्यास विलंब केल्याचा आरोप केला होता.
तत्पूर्वी, कतार आणि इजिप्तच्या मध्यस्थीने दोहा येथे झालेल्या चर्चेनंतर हमासने म्हटले आहे की, चर्चेत महत्त्वपूर्ण प्रगती झाली आहे. मात्र, इस्रायलने गाझातून सैन्य मागे घेण्यासंदर्भात, युद्धविरामासंदर्भात, कैदी आणि विस्थापितांसंदर्भात नव्या अटी ठेवल्या आहेत. या अटींमुळे संभाव्य करारावर अंतिम मोहर लागण्यास उशीर होत आहे. यानंतर, इस्रायली पंतप्रधान कार्यालयाने हमासचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच ज्या मुद्द्यांवर सहमती झाली होती, त्यांवर हमास आता मागे हटत आहे आणि चर्चेत अडथळा आणत आहे, असे म्हटले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Avinash