कीव, 21 नोव्हेंबर (हिं.स.) - रशियाने युक्रेनच्या दिशेने लांब पल्ल्याच्या (बॅलेस्टिक) क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याचा दावा युक्रेनच्या हवाई संरक्षण दलाने केला आहे. युक्रेनच्या राज्य आपत्कालीन सेवेने एका निवासी इमारतीला आग लागल्याचे आणि अपंग लोकांसाठी पुनर्वसन केंद्राचे नुकसान दाखवणारे फोटो शेअर केले आहेत. दरम्यान रशियाने मात्र या हल्ल्याबाबत काहीही भाष्य केलेलं नाही. अमेरिकेने युक्रेनला रशियाविरोधात लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र वापरण्याची परवानगी दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी रशियाने हा हल्ला केला आहे.
युक्रेनच्या हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, रशियाने आज (21 ऑक्टोबर) पहाटे पाचच्या सुमारास युक्रेनच्या निप्रो शहराच्या दिशेने हा हल्ला केला. यामुळे निप्रो शहर स्फोटांच्या मालिकांनी हादरले. त्यानंतरचे सुमारे तीन तास असे स्फोट होत होते. या हल्ल्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची क्षेपणास्त्र वापरल्याची माहिती आहे. रशिया आणि युक्रेन संघर्ष सुरू झाल्यानंतर रशियाने पहिल्यांदाच युक्रेनवर आयसीबीएम क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे. ही क्षेपणास्त्रं हजारो किलोमीटरपर्यंत हल्ला करू शकतात.
रशियाने डागलेली सहा केएच-101 क्रूझ क्षेपणास्त्रं पाडल्याचा दावा देखील युक्रेनच्या लष्कराने केला आहे. रशियाने असा दावा केला होता की युक्रेनने मागच्या आठवड्यात कथितरित्या रशियाच्या लष्करी तळांवर याच क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ला केला होता.
युक्रेनच्या निप्रॉपेट्रोव्स्कचे प्रादेशिक प्रमुख सेरी लिसाक यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्राइव्ही रीह शहरावर झालेल्या हल्ल्यात किमान 15 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींमध्ये 16 आणि 17 वर्षे वयाची दोन किशोरवयीन मुलं आहेत. सध्या नऊ जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी