
मॉस्को, 22 डिसेंबर (हिं.स.)।रशियाची राजधानी मॉस्को येथे आज, सोमवार २२ डिसेंबर रोजी, एक भीषण बॉम्बस्फोट झाला असून या स्फोटात एका वरिष्ठ रशियन जनरल फानिल सरवारोव यांचा मृत्यू झाला आहे. तपासात असे आढळून आले आहे की संबंधित रशियन जनरल यांच्या कारखाली स्फोटक ठेवण्यात आले होते. त्याचा स्फोट झाल्याने हा जोरदार धमाका झाला.
रशियन माध्यमांच्या माहितीनुसार, मॉस्कोच्या यासेनेव्हा रस्त्यावरील एका पार्किंगमध्ये सकाळी सुमारे ७ वाजता कारमध्ये स्फोट झाला, ज्यामध्ये रशियन जनरल फानिल सरवारोव यांचा मृत्यू झाला. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांनी सांगितले की राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना सरवारोव यांच्या हत्येबाबत माहिती देण्यात आली आहे. संरक्षण मंत्रालयाने सांगितले की सरवारोव यांनी यापूर्वी चेचन्यामध्ये लढाई लढली होती आणि सीरियामधील मॉस्कोच्या लष्करी मोहिमेतही ते सहभागी होते.
रशियन जनरलच्या हत्येमागे युक्रेनचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. रशियाच्या तपास समितीच्या अधिकृत प्रवक्त्या स्वेतलाना पेट्रेंको यांनी सांगितले कि, “तपासकर्ते या हत्येचा विविध बाजूंनी तपास करत आहेत. त्यापैकी एक शक्यता म्हणजे हा हल्ला युक्रेनच्या गुप्तचर सेवांकडून करण्यात आला आहे.”
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी किरीलोव यांच्या हत्येला रशियाच्या सुरक्षा यंत्रणांची मोठी चूक असल्याचे म्हटले होते आणि या घटनेतून धडा घेऊन कार्यक्षमता सुधारण्याची गरज असल्याचे नमूद केले होते. याआधी एप्रिल महिन्यात आणखी एक वरिष्ठ रशियन लष्करी अधिकारी, लेफ्टनंट जनरल यारोस्लाव मोस्कालिक, मॉस्कोच्या अगदी बाहेर त्यांच्या अपार्टमेंट इमारतीजवळ उभी असलेल्या कारमध्ये ठेवलेल्या स्फोटकाच्या स्फोटात ठार झाले. या प्रकरणात संशयित आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली. मॉस्कोने रशियामधील अनेक बॉम्बस्फोट आणि इतर हल्ल्यांसाठीही युक्रेनलाच जबाबदार धरले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode