
ढाका, 22 डिसेंबर (हिं.स.)।बांग्लादेशमधील हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाही. शरीफ उस्मान हादी यांच्या हत्येनंतर आता अज्ञात हल्लेखोरांनी नॅशनलिस्ट सिटिझन पार्टी (एनसीपी)चे खुलना प्रमुख मोतालेब सिकदर यांच्यावर गोळीबार केला आहे. सोनाडांगा परिसरात त्यांच्यावर भर रस्त्यात गोळी झाडण्यात आली.यानंतर सिकदर यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मोतालेब सिकदर खुलना येथे पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या विभागीय कामगार मेळाव्याच्या तयारीत गुंतले होते. हा मेळावा लवकरच होणार होता, त्याचदरम्यान त्यांच्यावर हा हल्ला झाला. सिकदर यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूला गोळी लागली आहे.
सोनाडांगा मॉडेल पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी (तपास) अनिमेष मंडल यांनी सांगितले की, गुंडांनी सिकदर यांच्यावर गोळीबार केला आणि स्थानिक नागरिकांनी त्यांना वाचवले. त्यानंतर त्यांना तात्काळ खुलना मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या सिकदर यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून तपासानंतर अधिक माहिती दिली जाईल, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
एनसीपीच्या खुलना मेट्रोपॉलिटन युनिटचे आयोजक सैफ नवाज यांनी सांगितले की, सिकदर हे केंद्रीय आयोजक असून एनसीपीच्या कामगार आघाडी ‘जातीय श्रमिक शक्ति’चे खुलना विभागीय संयोजक आहेत.
नॅशनलिस्ट सिटिझन पार्टीची स्थापना माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात झालेल्या आंदोलनानंतर करण्यात आली होती. या पक्षात शेख हसीना यांच्या विरोधात आंदोलन करणारेच अनेक कार्यकर्ते सामील आहेत. ढाका विद्यापीठातील मोठ्या संख्येने विद्यार्थी या पक्षाशी जोडलेले आहेत. बांग्लादेशमध्ये हा पक्ष प्रथमच निवडणूक लढवत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode