- आगामी 5 डिसेंबरला शपथविधी होण्याची शक्यता
- शिंदे गावी गेल्याने महायुतीची मुंबईतील बैठक रद्द
मुंबई, 29 नोव्हेंबर (हिं.स.) : विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या नेत्रदीपक विजयानंतर सरकार कधी स्थापणार आणि मुख्यमंत्री कोण..? यासंदर्भातील उत्सुकतेला लवकरच पूर्णविराम लागणार आहे. दिल्लीत गुरुवारी झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांच्या नावाला भाजप श्रेष्ठी आणि सहयोगी पक्षांची पसंती असून औपचारिक घोषणा शिल्लक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे येथे झालेल्या पत्रकारपरिषदेत एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा जो निर्णय घेतील तो मान्य असेल असे सांगितले होते. दरम्यान, केंद्रीय नेतृत्वाची भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती असल्याची माहिती पुढे आली. लवकरच अधिकृत घोषणा होईल आणि त्यानंतर 5 डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होत आहे. त्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एक मंत्रिपद दिले जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. महायुतीच्या तिन्ही नेत्यांची दिल्लीत जाऊन अमित शाहांची भेट घेतली. या भेटीत एकनाथ शिंदे यांनी आपल्या मागण्या भाजप नेत्यांपुढे ठेवल्या. यात मुख्यमंत्री पद देणार नसाल तर गृह, अर्थ, सार्वजनिक बांधकाम आणि विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेला मिळावे असा आग्रह केल्याचे सूत्रांनी सांगितले. या संदर्भात अधिक चर्चा आज, शुक्रवारी मुंबईत तिन्ही नेते एकत्र बसून घेणार होते. त्यासाठी बैठकीचे आयोजनही करण्यात आले होते. परंतु, एकनाथ शिंदे त्यांच्या गावी साताऱ्याला जाणार असल्याने बैठक रद्द करण्यात आली. आता ही बैठक 5 दिवसांनी होणार असल्याची माहिती मिळत आहे. इतकेच नाही तर शिवसेना आमदारांची आज होणारी बैठक देखील पुढे ढकलण्यात आली आहे. परिणामी मुख्यमंत्री पदाची घोषणाही लांबणीवर पडली आहे.
दरम्यान आता भाजपचे केंद्रीय निरीक्षक अश्विनी वैष्णव आणि भूपेंद्र यादव हे मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत भाजपच्या नेत्यांची बैठक होईल. त्यात विधीमंडळातील पक्ष नेत्यांची निवड होईल. एकूणच सर्व प्रक्रिया पार पडल्यावर अधिकृत घोषणा होईल अशी माहिती पुढे आली आहे. विधीमंडळ पक्षनेत्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर मुख्यमंत्री कोण यासंदर्भातील उत्सुकता दूर होणार आहे. दरम्यान महत्त्वाची खाती पदरात पाडून घेण्यासाठी महायुतीमधील घटकपक्षांचे आमदार, नेते पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी मुंबईत डेरेदाखल झाले आहेत. महत्त्वाच्या मंत्रिपदासाठी महायुतीमधील अनेकांचे लॉबिंग सुरू झालेय. मुख्यमंत्री पद सोडून इतर मंत्रिपदे मिळावी यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सिंचन, ऊर्जा आणि अर्थ खात्यांची मागणी पुढे आली आहे. असे असले तरी तुर्तास राजकीय वर्तुळ आणि राज्याची जनता ‘वेट ऍण्ड वॉच’च्या भूमिकेत आहे.
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी