भाजपचा प्रत्येक प्रदेशाध्यक्ष सामान्य कुटुंबातील- मुख्यमंत्री
मुंबई, 01 जुलै (हिं.स.) : भाजप सामान्य कार्यकर्त्याला मोठी करणारा पक्ष आहे. भाजपचा प्रत्येक प्रदेशाध्यक्ष सामान्य घरातील आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रक्त्याच्या नात्यातून होत नाहीत, आमचे नाते हिंदुत्वाचे आणि भारतीयत्वाचे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस


मुंबई, 01 जुलै (हिं.स.) : भाजप सामान्य कार्यकर्त्याला मोठी करणारा पक्ष आहे. भाजपचा प्रत्येक प्रदेशाध्यक्ष सामान्य घरातील आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रक्त्याच्या नात्यातून होत नाहीत, आमचे नाते हिंदुत्वाचे आणि भारतीयत्वाचे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुंबईतील वरळी डोममध्ये आयोजित कार्यक्रमात आज, मंगळवारी भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून रविंद्र चव्हाणांच्या नावाची घोषणा करण्यात आल्यानंतर फडणवीस बोलत होते.

याप्रसंगी फडणवीस म्हणाले की, देशातील 99 टक्के पक्षांमध्ये एकाच परिवारातील लोक अध्यक्ष होतात. अन्य पक्षांमध्ये रक्ताच्या नात्याविना अध्यक्ष होता येत नाही. परंतु, भाजपमध्ये सामान्य कार्यकर्ता राज्य, देश यांचा अध्यक्ष होऊ शकतो आणि पंतप्रधानही होऊ शकतो. ‘फेक नेरेटिव्ह’ निर्माण करणारी फॅक्टरी अद्याप संपलेली नाही. वेगवेगळ्या पद्धतीने नियमित ‘फेक नेरेटिव्ह’ निर्माण केले जात आहेत. रवींद्र चव्हाण यांच्या जिद्द आणि चिकाटी आहे. ते धाडसी आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कोकणातील प्रदेशाध्यक्ष ही कमतरता त्यांच्या निवडीने भरून काढली. दिलेले दायित्व काटेकोरपणे पूर्ण करणे हे चव्हाणांचे वैशिष्ट्य असून ते सातत्याने 24 तास पक्षाला वाहून घेतले समर्पित कार्यकर्ते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप अधिकाधिक प्रगती आणि विस्तार करेल, अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी रवींद्र चव्हाण यांचे कौतुक केले.

याप्रसंगी राज्यात भाषेवरून सुरू असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री म्हणाले की, आम्हाला हिंदी आणि भारतामधील प्रत्येक भाषेचा अभिमान आहे. हिंदीला विरोध करून आम्ही इंग्रजीला पायघड्या घालणारे नाही. महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय आम्ही घेऊ. महाराष्ट्राच्या हिताचे राजकारण करणारे आम्ही आहोत असा टोला देखील त्यांनी विरोधकांना लगावला.

------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande