नाशिक, 29 नोव्हेंबर (हिं.स.) : येवल्यातील स्टेशन रोडवरील लक्कडकोट पैठणी शोरूम फोडून लाखो रुपयांच्या पैठण्या चोरणाऱ्या चोरट्यास येवला शहर पोलिसांनी अवघ्या बारा तासांत अटक केली आहे. विशेष म्हणजे चोरटा हा याच शोरूममधील विक्रेता होता. पोलिसांनी या प्रकरणी एकूण ६ लाख ८४ हजार रुपये किमतीच्या पैठण्या, मोबाईल व डीव्हीआर असा मुद्देमाल जप्त केला आहे. या चोरीच्या प्रकरणात आणखी काही संशयितांचा सहभाग असल्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत माहिती अशी की, येवल्यातील कानडे गल्लीतील रहिवासी प्रशांत सुनील लक्कडकोट यांचे येवला-कोपरगाव रोडवर नांदेसर रेल्वे गेटजवळ लक्कडकोट पैठणी हे भव्य शोरूम आहे. या शोरूममध्ये अज्ञात चोरट्याने या ठिकाणची बाथरूमची खिडकी तोडून व लोखंडी शिडी लावून या शिडीद्वारे पैठणीच्या दुकानातून १५ पैठण्या व चार मोबाईल असा १ लाख ४८ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची फिर्याद येवला पोलिसांकडे दाखल केली होती. या घटनेचे गांभीर्य पाहून जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने व मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी मनमाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांना घटनास्थळी भेट देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महाजन यांनी भेट देऊन व पोलीस ठाण्यात थांबून तपासावर देखरेख ठेवली. दरम्यान, पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी दोन स्वतंत्र तपास पथके तयार केली. त्यापैकी तपास अधिकारी, उपनिरीक्षक डी. एम. लोखंडे, कॉन्स्टेबल निकम, पवार, दळवी, महिला पोलीस कॉन्स्टेबल राऊत यांच्या पथकाने घटनास्थळाचा पंचनामा करून विविध साक्षीदार तपासले. यावेळी शोरूमचे मालक सुनील लक्कडकोट यांच्या पत्नीने दुकानातील कामगार शब्बीर कदिर शेख (वय २७, रा. नांदगाव रोड, येवला) याच्यावर संशय व्यक्त केला. त्यास बोलावून चौकशी केली असता त्याने प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, कसून चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली दिली त्यास पोलीस कोठडी देण्यात आली. तसेच शोरूममधून चोरीला गेलेला सर्व माल, मोबाईल व डीव्हीआर असा ६ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, आरोपीचे आणखी कोणी सहकारी आहेत काय, याचा तपास करण्यात येणार आहे. गुन्ह्याच्या यशस्वी तपासाबद्दल उपनिरीक्षक डी. एम. लोखंडे, हवालदार मोरे, हेंबाडे, पोलीस नाईक जगधने, किरण पवार, कॉन्स्टेबल मुकेश निकम, बाबासाहेब पवार, जनार्दन दळवी, आव्हाड, महिला कॉन्स्टेबल स्वाती राऊत यांच्या पथकाचे जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI