नाशिक, 5 नोव्हेंबर, (हिं.स.)। नाशिकचा तलवारबाजीचा खेळाडू विरल मनोज म्हस्के याची जम्मू - काश्मीर येथे आयोजित राष्ट्रीय शालेय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. दिनांक २४ ते २६ ऑक्टोबर, २०२४ दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ईपी या प्रकारात विरलने नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व केले.
या राज्य स्पर्धेत विरलने सुंदर खेळ करून कास्य पदक पटकावले. त्याच्या या कामगिरीची दाखल घेऊन त्याची दिनांक १२ ते १६ नोव्हेंबर, २०२४ दरम्यान जम्मू - काश्मीर येथे आयोजित ६८ व्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल. याआधी नाशिक येथे झालेल्या जिल्हा शालेय स्पर्धेत विरलने प्रथम क्रमांक मिळविला होता. तर त्यानंतर आयोजित नाशिक विभागीय स्पर्धेतही त्याने हीच लय कायम राखत सुवर्ण पदकाची पुनरावृत्ती केली होती. तर छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या राज्य स्पर्धेतही विरलने अशीच उत्तम कामगिरी करून कास्य पदक मिळविले. विरलने अपेक्षेप्रमाणे राज्य स्पर्धेत उत्तम कामगिरी करून कास्य पदक पटकावत राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे. या राष्ट्रीय स्पर्धेतही तो सातत्य राखून पदक मिळवेल असा विश्वास त्याचे प्रशिक्षक प्रसाद परदेशी यांनी व्यक्त केला. विरलने याआधी १२ वर्षे वयोगटात महाराष्ट्राच्या संघातर्फे राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला आहे. तर बुलढाणा येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत कांस्यपदक मिळविले होते. विरल सॅक्रेड हार्ट स्कुलमध्ये शिकत असून त्याच्या निवडीबद्दल शाळेच्या प्रिन्सिपल सिस्टर ट्रेसी, क्रीडा शिक्षक गणेश राऊत आणि सर्व शिक्षकानी अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. याचबरोबर नाशिक जिल्हा तलवारबाजी असोसिएशनचे सचिव राजू शिंदे, क्रीडा संघटक अशोक दुधारे, आनंद खरे. दिपक निकम, जय शर्मा, आनंद चकोर, राहुल फडोळ, यांनी विरलचे अभिनंदन केले आणि राष्ट्रीय स्पर्धेमध्ये विरल अशीच कामगिरी करेल अश्या अपेक्षा व्यक्त केल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI