* राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२४ ची घोषणा
नवी दिल्ली, २ जानेवारी (हिं.स.) : युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने आज, गुरुवारी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२४ ची घोषणा केली. यामध्ये ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकर, जागतिक बुद्धिबळ स्पर्धेतील विजेता डी गुकेश, हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरालिम्पिक खेळाडू प्रवीण कुमार यांना खेल रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. एकूण ३२ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे.
१७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रपती भवन येथे आयोजित कार्यक्रमात पुरस्कार विजेत्यांना भारताच्या राष्ट्रपतींकडून त्यांचे पुरस्कार प्रदान केले जातील.
पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग याच्या नेतृत्वाखाली भारताने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते आणि त्याच्या नावाची मेजर ध्यान चंद खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली होती. त्याच्यासह या पुरस्कारासाठी पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत उंच उडी T64 गटात सुवर्णपदक जिंकणाऱ्या प्रवीण कुमार याचेही नाव पाठवण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व्ही रामासुब्रमणियम यांच्या अध्यक्षतेखालील १२ सदस्यीय निवड समितीने ही दोन नावं सुचवली होती.
दरम्यान, १८ वर्षीय भारतीय बुद्धिबळवीर डी गुकेशने नुकताच सिंगापूरमध्ये विद्यमान चॅम्पियन डिंग लिरेनला हरवून जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. या विजयाबरोबर तो इतिहासातील सर्वात तरुण जागतिक चॅम्पियन बनला आहे. गुकेशने वयाच्या ११ व्या वर्षी बोलून दाखवलेला निर्धार आज पूर्ण केला आणि तो १८ वर्ष, ८ महिने, १४ दिवसांचा असताना वर्ल्ड चॅम्पियन ठरला. त्याने गॅरी कास्परोव्ह यांनी १९८५ मध्ये २२ वर्ष, ६ महिने, २७ दिवसांचा असताना नोंदवलेला विक्रम मोडला. त्यालाही या सर्वोच्च क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
स्वप्नील कुसळेचाही सन्मान
महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळेला अर्जुन पुरस्कारची घोषणा झाली आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४च्या स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने नेमबाजीत कांस्यपदक जिंकले होते. स्वप्नीलच्या गुरु दिपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाला आहे. अर्जुन पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडूंना १५ लाख रुपये मिळतात. यावर्षीची पुरस्कार जाहीर झालेल्यांची यादी पाहता त्यात क्रिकेटपट्टूंचा समावेश नसल्याचे चित्र पाहायला मिळाले.
यापूर्वी खेलरत्न पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडूंना फक्त ७.५ लाख रुपये मिळत होते, परंतु २०२० मध्ये ते २५ लाख रुपये करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी