अहिल्यानगर, 2 जानेवारी (हिं.स.)।
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमध्ये तरुणांना करिअरसाठी सर्व संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. २५ वर्षापासून जयहिंदच्या वतीने सहकारमहर्षी क्रिकेट चषकाचे आयोजन होत असून संपूर्ण मैदानावर हिरवळ टर्फ विकेट यासह राज्यभरातील नामांकित खेळाडूंचा सहभाग यामुळे ही स्पर्धा राज्यपातळीवर लौकिकास्पद ठरली असून पुढील पंधरा दिवसांमध्ये क्रीडा रसिकांसाठी मोठी मेजवानी ठरणार असल्याचे प्रतिपादन आयोजक तथा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केले आहे.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे जयहिंद लोकचळवळ व क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांच्या वतीने आयोजित सहकारमहर्षी टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या २५ वर्षाच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी बोलताना तांबे म्हणाले की,संगमनेरमध्ये सुसज्ज क्रीडा संकुल व्हावे ही भाऊसाहेब थोरात यांची खूप इच्छा होती.याकरता त्यांनी शेतकी संघाची एक एकर जागा व उर्वरित जागा गोखले एज्युकेशन कडून घेऊन क्रीडा संकुलाला दिली.माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर मध्ये अत्यंत अद्यावत असे हे क्रीडा संकुल उभारले गेले.खेळाच्या सुविधा निर्माण केल्या गेल्या.राज्यभरात कोठे नाही अशी व्यवस्था आपण तयार केली आहे.मागील पंचवीस वर्षापासून जयहिंदच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धा होत असून अत्यंत चांगल्या नियोजनामुळे आयपीएल आणि रणजी मधील अनेक खेळाडू या ठिकाणी सहभा गी होत असतात.प्रत्येक सामन्यासाठी प्रेक्षकांची मोठी उपस्थिती राहत असून येणाऱ्या १७ दिवसांमध्ये संगमनेर मधील सर्व क्रीडा रसिकांसाठी या स्पर्धा मोठी मेजवानी ठरणार आहे.
डॉ.तांबे म्हणाले की, क्रिकेट या खेळांमधून सांघिक भावना वाढीस लागत असून जय पराजय पेक्षा खिलाडू वृत्ती निर्माण होते. हे अत्यंत चांगले आहे.संगमनेरचे नाव क्रिकेट मधून अजिंक्य रहाणे सह अनेकांनी देशपातळीवर नेले आहे.या पुढील काळातही युवकांनी विविध खेळांमधून संगमनेरचे नाव देशपातळीवर पुढे घेऊन जावे, असे आवाहन त्यांनी केले.
हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni