संशयित म्हणून पकडले, निघाला 'सुपारीबाज', नाशिकमध्ये खुनाची सुपारी, पालघरमधून अटक
नाशिक, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। येथील राहुल पवार याला मारण्याची सुपारी घेणाऱ्या शुभम सिंग (२९, रा. लुधियाना) याला पालघरमध्ये जेरबंद करण्यात आले आहे. तुरुंगात असलेल्या दोन आरोपींनी त्याला या हत्येची सुपारी दिलेली होती, असे स्पष्ट झाले असतानाच तो 'सुपा
संशयित म्हणून पकडले, निघाला 'सुपारीबाज', नाशिकमध्ये खुनाची सुपारी, पालघरमधून अटक


नाशिक, 6 नोव्हेंबर (हिं.स.)।

येथील राहुल पवार याला मारण्याची सुपारी घेणाऱ्या शुभम सिंग (२९, रा. लुधियाना) याला पालघरमध्ये जेरबंद करण्यात आले आहे. तुरुंगात असलेल्या दोन आरोपींनी त्याला या हत्येची सुपारी दिलेली होती, असे स्पष्ट झाले असतानाच तो 'सुपारीबाज' असल्याचेही पोलिस चौकशीत उघड झाले आहे.

पालघर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनंत पराड हे आपले सहकारी उपनिरीक्षक अविनाश वळवी, संकेत पगडे, सहायक फौजदार खंडागळे, हवालदार अशोक तायडे, परमेश्वर मुसळे, सागर राऊत, आकाश आराक, खरपडे, राऊत यांच्यासह गस्त घालत असताना पालघर रेल्वे स्थानकाजवळ एक संशयित व्यक्ती फिरत असल्याची माहिती त्यांना मिळाली. यावेळी पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक पिस्तूल, सात जिवंत काडतुसे, अशी एकूण एक लाख ६६ हजार किमतीची घातक शस्त्रे सापडली. त्याचे नाव शुभम सिंग असे असून तो लुधियानातील व्यक्ती असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. यावेळी नाशिक तुरुंगामध्ये खून आणि दरोड्याच्या प्रकरणातील आरोपी परमिंदर ऊर्फ गौरव राजेंद्र सिंग आणि सातपूर पोलिस ठाणे येथे खुनाचा गुन्हा दाखल असलेला आरोपी आशिष राजेंद्र जाधव या दोघांनी राहुल पवार याला ठार मारण्याची सुपारी त्याला दिल्याची माहितीही त्याने पोलिसांना दिली.

रेकी केली; पण प्रयत्न फसले

शुभम याने अनेक दिवस राहुल पवार यांच्या घराजवळ रेकी करून त्याला ठार मारण्याचे प्रयत्न केले, मात्र ते यशस्वी होत नसल्याने त्याने कंटाळून बोईसर येथील आपल्या नातेवाइकांशी संपर्क साधत त्यांच्या घरी येत असल्याचे कळवले. तो शुक्रवारी पालघर रेल्वे स्थानकाजवळ आला असताना पालघर पोलिसांनी त्याला रिव्हाॅल्व्हरसह अटक केली. यावेळी त्याला नेण्यासाठी बोईसर येथून आलेला रिक्षाचालक आणि अन्य एका व्यक्तीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का, याची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande