स्वातंत्र्यसैनिकांच्या घरांवर बुलडोझर फिरविणारा डीपी रोड तात्काळ रद्द करा - दशरथ पाटील
ठाणे, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। खारीगाव येथील प्रस्तावित डीपी रोड भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करणारा आहे. स्वातंत्र्यसैनिकांच्या घरावर, १७ रहिवासी इमारतींवर आणि जरीमरी ग्रामदेवतेच्या मंदिरावर बुलडोजर फिरविण्याचा घाट या डीपी रोडच्या माध्यमातून घालण्यात आला
Thane


ठाणे, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। खारीगाव येथील प्रस्तावित डीपी रोड भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करणारा आहे. स्वातंत्र्यसैनिकांच्या घरावर, १७ रहिवासी इमारतींवर आणि जरीमरी ग्रामदेवतेच्या मंदिरावर बुलडोजर फिरविण्याचा घाट या डीपी रोडच्या माध्यमातून घालण्यात आला आहे. याला आमचा तीव्र विरोध असल्याची माहिती ज्येष्ठ नेते दशरथ दादा पाटील यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी माजी नगरसेवक उमेश पाटील, गजानन पवार, सुधीर पाटील, युवा नेते राकेश पाटील, रचना पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

ठाणे महानगरपालिकेने खारीगावमधून डीपी रोडचा प्रस्ताव टाकला आहे. हा डीपी रोड पुढे नाशिक महामार्गाला जोडला जाणार आहे. या डीपी रोडमुळे खारीगावची संस्कृती नष्ट होणार आहे. स्वातंत्र्यसैनिक तसेच १७ रहिवासी इमारती, ग्रामपंचायतपासूनची १८ जुनी घरे तसेच खारीगांवची ग्रामदेवता जरीमरीचे प्राचीन मंदिर यात तोडले जाणार आहे. महत्त्वाचे या डीपी रोडबाबत भूमिपुत्रानी हरकती नोंदविल्या आहेत. तरी हा डीपी रोड करण्याचा घाट घातला जात असून तो रद्द करावा अशी मागणी असल्याचे दशरथ पाटील यांनी यावेळी सांगितले.

हा डीपी रोड रद्द करावा म्हणून मी 2020 सालापासून ते सन २०२४ पर्यंत पालिका प्रशासनाकडे पाठपुरवा करत असल्याचे नगरसेवक उमेश पाटील यांनी सांगितले. पालिका प्रशासनानेही डीपी रोड रद्द करण्यासाठी मला पत्र देत सकारत्मकता दर्शविली होती. मात्र आता रस्त्याचा घाट का घातला जात आहे, हे प्रकरण संशयास्पद असल्याचा आरोप उमेश पाटील यांनी केला आहे.

जर आम्हाला एवढे करूनही न्याय मिळाला नाही तर आम्ही कोकण आयुक्तांकडे अपिल करणार आहोत, तेथे न्याय मिळाला नाही तर नगर विकास खाते, मुख्यमंत्री यांना निवेदन देणार आहोत असे दशरथ पाटील यांनी यावेळी सांगून हा डिपी रोड रद्द करावा अशी आग्रहाची मागणी केली आहे आणि यात राजकारण नको असेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande