रत्नागिरी, 2 जानेवारी, (हिं. स.) : कोकण हा शिवसेनेचा गेली अनेक वर्षे बालेकिल्ला होता. मात्र पक्ष फुटीनंतर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षासह आम्हाला सर्वांनाच काही गोष्टी बदलाव्या लागतील. पक्षाच्या कार्यपद्धतीत बदल करावा लागेल. आता मुंबईतून येथे नेतृत्व आणून उभे करण्यापेक्षा स्थानिक नेतृत्व पुढे आणावे आणि उभे करावे लागेल. संपर्कप्रमुखदेखील स्थानिक स्तरावर निर्माण करायला हवा, जिल्हाप्रमुखाला खास अधिकार द्यावे लागतील, असे मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केले.
विधानसभा निवडणुकीनंतर आमदार भास्कर जाधव मतदारसंघातील प्रश्नांसदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे शिवसेनेला उभारी देण्याबाबत पुढील संघटनात्मक बांधणी कशा प्रकारे करता येईल याविषयी पत्रकारांशी मत व्यक्त केले. या निवडणुकीत कोकणपट्ट्यात ठाकरे सेनेचा एकमेव आमदार म्हणून आपण निवडून आले, पण माझ्या पक्षाच्या लोकांना, शिवसैनिकांना शासन दरबारी योग्य न्याय मिळायला हवा. त्यांचा लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार नाही म्हणून येथे दुर्लक्ष होऊ नये, त्यांच्या शब्दाचे प्रतिनिधित्व कमी होता कामा नये, या सगळ्यांची जबाबदारी माझ्यावर असल्याचे आमदार जाधव म्हणाले. उबाठाला संपूर्ण कोकणात आता आधार देणे, त्यांच्यावर अन्याय होत असेल तर पाठीशी खंबीर उभे राहणार आहे.
स्थानिक नेतृत्वाचा कस लावावा लागणार आहे. ही पक्ष संघटना आदेशावर चालणारी आहे. पण मात्र स्थानिक नेतृत्व उभे करावे लागेल. पूर्वीच्या पद्धतीनुसार मुंबईतून संपर्कप्रमुख पाठवले जात; पण हे तेथे नेते पाठवणे वेगळे. संपर्कप्रमुख स्थानिक निर्माण करायला हवा. जिल्हाप्रमुखाला खास अधिकार द्यावे लागतील. कारण आता शिवसैनिक बोलायला, जाब विचारायला लागला आहे. पण अधिकार नसतील तर काय बोलणार? त्यासाठी या पदाधिकाऱ्यांना अधिकार वाढवायला लागतील असेही ते म्हणाले.
आमदार भास्कर जाधव यांनी गुहागर‚ चिपळूण मतदारसंघातील विकासकामांसंदर्भात जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा आरोग्य विभाग यांच्यांशी भेट घेत चर्चा केली. त्यामध्ये मतदारसंघात छ.शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळा पूर्णाकृती पुतळा उभारणी, चिपळूण रेल्वेस्थानक येथे महिला बचतगटासाठी गाळा मिळावा, येथील कुठलीही कारखानदारीत ८० टक्के स्थानिकांना प्राधान्य मिळावे, क्रीडा संकुल पूर्णत्वास नेण्याबाबत, प्रलंबित गामीण रुग्णालयाला मिळालेला दर्जातील तांत्रिक विषय, आरजीपीएल, निरामय रुग्णालय सुरू करण्याबाबत आमदार जाधव यांनी या भेटीत चर्चा केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / बाळकृष्ण कोनकर