रत्नागिरी, 2 जानेवारी, (हिं. स.) : ज्या विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या पिकांबाबत विम्याची नुकसान भरपाई दिलेली नसेल, त्या सर्व विमा कंपन्यांवर शेतकऱ्यांना फसवल्याचा गुन्हा दाखल करावा, असे निर्देश खासदार सुनील तटकरे यांनी दिले. सर्वसामान्यांसाठी योजना राबविण्यात, कामकाजात अधिकाऱ्यांनी तरबेज व्हावे, तरच आपण प्रगती करू, असे खासदार नारायण राणे यांनी सांगितले.
जिल्हा विकास समन्वयक व संनियंत्रण (दिशा) समितीची बैठक खासदार श्री. तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच खासदार श्री. राणे यांच्या सहअध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज झाली. त्यावेळी दोघे खासदार बोलत होते. बैठकीला आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे उपस्थित होते.
श्री. तटकरे म्हणाले, दिव्यांगांच्या तसेच वयोश्री योजनेकडे अधिक लक्ष द्यायला हवे. तालुकानिहाय लाभार्थ्यांना दिलेल्या लाभाची माहिती तसेच सद्यःस्थिती याची माहिती हवी. प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय आरोग्य शिबिर घेण्यासाठी कृती आराखडा तयार करावा. शेतीसाठी सौरऊर्जेबाबत येथील भौगोलिक स्थिती वरिष्ठांना सांगावी. यांत्रिकरणाची योजना पंचायत समितीमार्फत लाभार्थ्यांपर्यंत पोहचवावी. अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय स्तरावर जाऊन सखोल काम करावे.
बीएसएनएलच्या कामाबाबत असमाधान व्यक्त करून ठेकेदारांवर कारवाई करण्याबाबत त्यांनी सूचना केली. जलपर्यटन सुरू करण्याबाबत सूचना करतानाच खासदार श्री. तटकरे म्हणाले, जिल्ह्यात मायनिंग कुठे कुठे आहे, त्यामधून उत्पन्न किती होत आहे, याबाबतची माहिती द्यावी. पर्यटनाशी निगडित प्रशिक्षण देण्याबाबत कौशल्य विकास विभागाने आराखडा तयार करावा. परंपरागत व्यवसाय, पर्यटन याची सांगड घालून बचत गटांच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम घ्यावा. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमधील दर्जेदार कामे करा. अधिकाऱ्यांनी कसोशीने लक्ष घालून अधिक दक्षतेने काम करावे. कृषी, पर्यटन, फलोत्पादन अधिक क्षेत्रांमध्ये मोठा वाव आहे. सामाजिक समानता अतिशय उत्तम राखणारे मुलींचे चांगले प्रमाण आहे. सिंधुरत्न योजनेमधूनही चांगल्या गोष्टी करता येऊ शकतात. जिल्ह्याच्या प्रगतीसाठी अधिक दक्षतेने अधिकाऱ्यांनी काम करावे, असेही ते म्हणाले.
श्री. राणे म्हणाले, निर्यात वाढण्यासाठी कोणते उत्पादने आहेत, याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायला हवे. शेतीमधील नवे तंत्रज्ञान, खते, पाणी याबाबतचे नियोजन आदींबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. जिल्ह्याचे पर्यायाने राज्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी अधिकाऱ्यांनी मानसिकता बदलून काम करावे. पर्यटन वाढीसाठी पर्यटकांसाठी सुविधा वाढवायला हव्यात. उद्योग, व्यवसायासाठी मार्केटींगच्या पध्दती, ग्राहकांना काय हवे याबाबतचे मार्गदर्शन करायला हवे. प्रत्येक योजनांमध्ये लाभार्थ्यांचा आकडा वाढायला हवा. या योजना गरिबांना मिळण्यासाठी प्रमाणिकपणे काम करा. भ्रष्टाचार झाल्यास अशा अधिकाऱ्यास जाग्यावर निलंबित करा. जिल्ह्याची प्रगती करण्यासाठी बुद्धीमत्तेला प्रमाणिकपणाची जोड द्यावी. उद्दिष्टापेक्षा जास्त काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना बक्षीस द्या.
जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी संगणकीय सादरीकरण करून सविस्तर माहिती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुजार यांनी हाऊस बोट प्रकल्प, टुरिस्ट बोट प्रकल्पाबाबत माहिती दिली. बैठकीला समिती सदस्य नेहा जाधव, सतीश दिवेकर, शेखर उकार्डे, संदीप बांदकर, सुरेश सावंत, सखाराम कदम आदींसह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / बाळकृष्ण कोनकर