मुंबई, 7 नोव्हेंबर (हिं.स.)।मुंबईकरांना उत्तमोत्तम सेवा-सुविधा देणाऱया बृहन्मुंबई महानगरपालिकेची ख्याती जगभरात पसरली आहे. या सेवा-सुविधांमध्ये मुंबई अग्निशमन दलाचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. कार्यतत्परता, आधुनिकता आणि समयसूचकता या सर्वांमध्ये मुंबई अग्निशमन दल सदैव अग्रेसर असते, असे गौरवोद्गार बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी काढले.
मुंबई अग्निशमन दलातील अधिकारी आणि कर्मचाऱयांशी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी संवाद साधला. भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन कक्षातील सभागृहात ही बैठक पार पडली.
महानगरपालिका आयुक्त गगराणी म्हणाले की, घनदाट लोकवस्ती असलेल्या मुंबई महानगरात मुंबई अग्निशमन दलावर अतिशय महत्त्वाची जबाबदारी आहे. या दलातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर मुंबईकरांचा विश्वास आहे. शौर्य आणि पराक्रमाचा इतिहास लाभलेल्या या दलाकडे आज विविध अत्याधुनिक साधने आहेत. त्यामुळे संकटात अडकलेल्या नागरिकांची वेळीच सुटका करण्यास मदत होते. संकटसमयी पोहचण्याचा कालावधी आणखी कमी कसा करता येईल, यासाठी प्रत्येक अग्निशामकाने प्रयत्न करावे, असे आवाहनही गगराणी यांनी केले.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनीही अधिकारी-कर्मचाऱयांशी संवाद साधला. एखादी दुर्घटना घडल्यावर मुंबई अग्निश्मन दलाची यंत्रणा कशाप्रकारे कार्यरत असते, याबाबत सैनी यांनी कर्मचाऱयांशी संवाद साधला. तसेच विविध अत्याधुनिक यंत्रणांबाबतही माहिती जाणून घेतली.
उप आयुक्त (वित्त) प्रशांत गायकवाड यांनी मुंबई अग्निशमन दलात नुकतेच भरती झालेल्या अग्निशामकांशी संवाद साधताना त्यांचे अनुभव जाणून घेतले. मुंबई अग्निशमन दल हा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिरपेचातील मानाचा तुरा आहे, अशा शब्दात गायकवाड यांनी अग्निशमन दलाची पाठ थोपटली.
कार्यक्रमात संगणकीय सादरीकरणाद्वारे मुंबई अग्निशमन दलाचे सामर्थ्य, आधुनिक यंत्रणा, कर्मचाऱयांचा फौजफाटा आणि शौर्यगाथेवर प्रकाश टाकण्यात आला. महानगरपालिका आयुक्त गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी, उप आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी सभागृहात असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱयांमध्ये जावून हस्तांदोलन केल्याने उपस्थित अधिकारी-कर्मचारी भारावून गेले. अनेकांनी हा क्षण आपल्या मोबाइलमध्ये साठवून घेतला.
अधिकारी-कर्मचाऱयांशी दिलखुलास गप्पा
महानगरपालिका आयुक्त गगराणी यांनी या संपूर्ण संवादात वेळोवळी मुंबई अग्निशमन दलातील अधिकारी आणि कर्मचाऱयांची मतेही जाणून घेतली. एखादी दुर्घटना घडल्यानंतर अग्निशमन दलाची यंत्रणा कशाप्रकारे धावून जाते इथपासून तर नवनियुक्त अग्निशामकांचे दलातील अनुभवापर्यंत त्यांनी दिलखुलास गप्पा केल्या. या संवादात्मक चर्चेत महिला अधिकारी आणि अग्निशामकांनीही मते व्यक्त केली.
प्राणिसंग्रहालयातील विविध कक्षांना आयुक्तांनी दिली भेट
मुंबई अग्निशमन दलातील अधिकारी, कर्मचाऱयांशी संवाद साधल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अधिकाऱयांनी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात फेरफटका मारला. प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांसाठी असलेल्या वैद्यकीय सुविधांची माहिती त्यांनी जाणून घेतली. तसेच पेंग्विन कक्षासही भेट दिली. उप अधीक्षक डॉ. कोमल राऊळ यांनी प्राणिसंग्रहालयातील व्यवस्थेबाबत माहिती दिली.
हिंदुस्थान समाचार / मेघा माने