रत्नागिरी : हातखंब्यात टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
रत्नागिरी, 14 डिसेंबर, (हिं. स.) : मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा येथील दर्ग्याजवळ पाण्याच्या टँकरने दुचाकीस्वाराला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार शिशिर रावणंग (३६, निवळी, रत्नागिरी) यांचा जागीच मृत्यू झाला. काल (दि. १३ डिसेंबर) रा
शिशिर रावणंग


रत्नागिरी, 14 डिसेंबर, (हिं. स.) : मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा येथील दर्ग्याजवळ पाण्याच्या टँकरने दुचाकीस्वाराला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार शिशिर रावणंग (३६, निवळी, रत्नागिरी) यांचा जागीच मृत्यू झाला. काल (दि. १३ डिसेंबर) रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. टँकर चालक सोनू महतो (रा. झारखंड) याला पोलिसांनी अटक केली आहे.

दुचाकीला धडक देणारा टँकर हा मुंबई-गोवा महामार्गाचे काम करणाऱ्या एका कंपनीचा होता. शिशिर यांच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या टँकरने (क्र. एमएच ०५ बीए ३६७७) जोरदार धडक दिली. त्या धडकेत शिशिर दुचाकीवरून फेकला गेला. त्यात तो गंभीर जखमी होऊन जागीच गतप्राण झाला. या अपघातानंतर टँकरचालक तत्काळ घटनास्थळावरून पसार झाला. अपघात पाहताच आजूबाजूच्या ग्रामस्थांनी धाव घेतली. गंभीर जखमी होऊन निपचित पडलेल्या शिशिर यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलविले. तेथे दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

अपघाताची खबर हातखंबा, निवळी, तसेच रत्नागिरी शहर परिसरात पसरली. त्याच्या नातेवाईकांसह मित्रपरिवाराने जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. टँकरचालकावर तत्काळ गुन्हा दाखल करून अटकेची मागणी करण्यात आली.

शिशिर एअरटेल कंपनीत एरिया मॅनेजर होता. शुक्रवारी रात्री ८.१५ वाजता लांजा येथील आपले काम आटोपून तो निवळी येथील आपल्या घरी निघाला होता. यावेळी हातखंबा येथील दर्ग्याजवळ आला असता महामार्गाचे काम करणाऱ्या एका कंपनीच्या पाण्याच्या टँकरने त्याच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. टँकर चालकाला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांकडे टँकर चालक सोनू महतो (रा. झारखंड) याला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / बाळकृष्ण कोनकर


 rajesh pande