रत्नागिरी, 14 डिसेंबर, (हिं. स.) : भगवद्गीता सदैव सोबत ठेवा, वाचायला शिका आणि सातत्याने वाचायला शिका. तिसऱ्या पायरीवर विचार करायला शिका, असे प्रतिपादन चिपळूण येथील प्रवचनकार धनंजय चितळे यांनी केले.
गीता जयंतीनिमित्त रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी आणि रत्नागिरीतील गीताप्रेमींनी रा. भा. शिर्के प्रशालेच्या रंजन मंदिरात कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी श्री. चितळे बोलत होते. 'श्रीमद्भगवद्गीता महती आणि गीतेचा अभ्यास' यावर त्यांनी प्रकाश टाकला.
ते म्हणाले,महाभारत आणि गीतेवर जगभरात अनेकांनी अभ्यास, संशोधन केले. ज्ञानेश्वर माऊली, योगी अरविंद, विनोबा भावे, स. कृ. देवधर, ओपनहायमर यांचे संदर्भ धनंजय चितळे यांनी दिले. ते म्हणाले की, युद्धभूमीवर अर्जुन म्हणतो की मी युद्ध का करतोय, युद्ध नाही केले तर काय फरक पडेल, खरे तर युद्ध नकोच या भूमिकेपर्यंत अर्जुन गेला होता. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने गीता सांगितली. लोकमान्यांनी १८७६ मध्ये पहिल्यांदा श्रीमद्भगवद्गीता त्यांच्या वडिलांना वाचून दाखवली. त्यानंतर गीतेचे चिंतन सुरू केले व १८९० च्या आसपास गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. दूरदर्शनवरील निर्मात्या सुहासिनी मुळगावकर यांनी कॉलेजला एसटीतून येता-जाताना गीतेमधील ७०० श्लोक पाठ केले. तेव्हा आपल्यालासुद्धा गीता पाठ करणे अशक्य नाही. अर्जुनाची आलेली विविध नावे आणि आलेल्या विभूती यांवर अभ्यास केला पाहिजे. अकराव्या अध्यायात अर्जुन क्षमापन स्तोत्र आहे. ते परमार्थासाठी जरूर दररोज वाचावे.
शिर्के प्रशालेच्या मुख्याध्यापिका स्नेहा साखळकर यांच्या हस्ते गीतापूजन होऊन कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. त्यानंतर संपूर्ण गीतापठण करण्यात आले. यात गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रा. भा. शिर्के प्रशाला, गोदूताई जांभेकर विद्यालय, जीजीपीएस, एस. वाय. गोडबोले विद्यामंदिर, पटवर्धन हायस्कूल, फाटक प्रशाला तसेच अन्य शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थी, शिक्षक, गीताप्रेमींनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष श्रीमती शिल्पाताई पटवर्धन यांनी, भरपूर श्रीमंती असली तरी सुख कशात मिळते, याची बोधकथा सांगून आजच्या कार्यक्रमाविषयी कौतुकोद्गार काढले. कविकुलगुरु कालिदास विद्यापीठाच्या महामहोपाध्याय पां. वा. काणे संस्कृत उपकेंद्राचे डॉ. दिनकर मराठे यांनी शाळेतील मुलांसाठी व सर्व वयोगटाच्या लोकांसाठी भगवद्गीता उपयुक्त आहे, असे सांगितले. सूत्रसंचालन डॉ. कल्पना आठल्ये यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / बाळकृष्ण कोनकर