रत्नागिरी तहसीलदार कार्यालयातर्फे आणीबाणीत कारावास भोगलेल्यांना सन्मानपत्र
रत्नागिरी, 1 जुलै, (हिं. स.) : 1975 ते 1977 या आणीबाणी कालावधीत लोकशाहीकरिता लढा देताना मिसा व डीआयआर अंतर्गत सामाजिक व राजनैतिक कारणासाठी कारावास भोगलेल्या व्यक्तींना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना रत्नागिरी तहसीलदार कार्यालयातर्फे सन्मानपत्र देण्यात आ
आणीबाणीत कारावास भोगलेल्यांना सन्मानपत्र


रत्नागिरी, 1 जुलै, (हिं. स.) : 1975 ते 1977 या आणीबाणी कालावधीत लोकशाहीकरिता लढा देताना मिसा व डीआयआर अंतर्गत सामाजिक व राजनैतिक कारणासाठी कारावास भोगलेल्या व्यक्तींना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना रत्नागिरी तहसीलदार कार्यालयातर्फे सन्मानपत्र देण्यात आले.

यावेळी संविधान हत्या दिनानिमित्त पोस्टर्स प्रदर्शनही करण्यात आले. तहसीलदार कार्यालय तथा कार्यकारी दंडाधिकारी यांच्या वतीने आज झालेल्या या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे उपस्थित होते.

अपर जिल्हाधिकारी श्री. गलांडे म्हणाले, 25 जून 1975 ते 21 मार्च 1977 या 21 महिन्यांच्या या कालावधीत घटनेमधील तरतुदींचा आधार घेऊन आणीबाणी लागू करण्यात आली होती. यावेळी विरोध करणाऱ्यांना तुरुंगवास भोगावा लागला. आपल्या देशाला संघर्ष करून स्वातंत्र्य मिळाले आहे. आणीबाणीच्या काळात मिसा, डीआयआरअंतर्गत सामाजिक व राजनैतिक कारणांसाठी तुरुंगवास झाला, वेदना झाल्या, अशा लढवय्यांचा सन्मान करण्याचा आजचा दिवस आहे.

प्रांताधिकारी श्री. देसाई यांनी यावेळी सन्मानपत्राचे वाचन केले. याप्रसंगी उपस्थित बलवंत मधुसूदन वेलणकर, शिवराम बाळकृष्ण ठीक, सुभाष श्रीधर राणे, प्रदीप चंद्रकांत परुळेकर, यशवंत रत्नू पाले, वैदेही श्रीराम रायकर, विवेक जगन्नाथ भावे, संजय शांताराम केतकर, सुहासिनी मधुकर रसाळ, महेंद्र रामकृष्ण सुर्वे, सुनंदा पुरुषोत्तम बेर्डे यांना सन्मानपत्र देण्यात आले. श्री. परुळेकर व श्रीमती रायकर यांनी मनोगत व्यक्त करून आणीबाणीतील आठवणी सांगितल्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तहसीलदार श्री. म्हात्रे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande